Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली `धकधक गर्ल` माधुरी, कशी ते तुम्हीच पाहा
सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबई : 'धकधक गर्ल' म्हणून माधुरी दीक्षित हिनं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव कित्येक वर्षांपूर्वीच घेतला. किंबहुना अनेक दशकं तिनं चाहत्यांच्या मनावर अधिाराज्य गाजवलं. देशविदेशात तिनं चाहतावर्ग निर्माण केला. असं करता करत आता माधुरी थेट टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympics) पोहोचली आहे.
आता तुम्ही म्हणाल की मधुरीनं चित्रपट जगत सोडून क्रीडा वर्तुळाची वाट धरली की काय? तर, तसं नाहीये. माधुरी प्रत्यक्षात टोकियोमध्ये गेली नाही, तर एका खास व्हिडीओच्या माध्यमातून तिनं ऑलिम्पिक गाजवलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये माधुरीच्या 'आजा नचले' या चित्रपटाच्या शीर्षक गीतावर इस्रायलच्या महिला जलतरणपटू Eden Blecher आणि Shelly Bobritsky यांनी अफलातून परफॉर्मन्स दिला आहे. अक्वेटीक सेंटरमध्ये या जोडीनं आर्टीस्टीक स्विमिंग इवेंटमध्ये त्यांनी या गाण्यावर परफॉर्मन्स दिला.
सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडीओला अनेकांनीच शेअर केलं आहे. तर, माधुरी गाण्याच्या माध्यमातून थेट ऑलिम्पिकमध्येच पोहोचली अशी प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी दिली.
आर्टिस्टीक स्विमिंग या प्रकारामध्ये जलतरणपटूंचा अंदाज आणि त्यांची एकाग्रता जितकी महत्त्वाची असते, तितकंच दोन खेळाडूंमध्ये असणारा समन्वयही तितकाच महत्त्वाचा असतो. ठेका, लय आणि स्विमिंग या साऱ्याचा मेळ इथं साधावा लागतो ज्याची झलक इस्रायलच्या जलतरणपटूंच्या परफॉर्मन्समधून पाहायला मिळत आहे.