माऊंट मॉनगनुई: सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर  असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानने पाच दिवसांच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमानानांचा धुव्वा उडवल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या तिनही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयी पताका उंचावली असून, मालिकाही खिशात टाकली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजाचा मारा झेलत न्यूझीलंडच्या संघाने २४३ धावा केल्या. यजमानांनी दिलेलं हे लक्ष्य भारताकडून अवघे तीन गडी गमावत निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आलं. ज्यामुळे परिणामी भारताने सामना आणि मालिका जिंकत क्रीडारसिकांची दाद मिळवली. 


तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून गोलंदाजांनी विशेष कामगिरी बजावली. ज्यामध्ये मोहम्मद शमीने विरोधी संघाचे एकूण तीन गडी बाद करत सामनावीराचा किताब पटकवला. ज्यानंतर हे स्वीकारतेवेळी शमीला सायमन डूलने इंग्रजीत एक प्रश्न विचारला. न्यूझीलंडमध्ये हवेचा वेग आणि एकंदर परिस्थिती पाहता गोलंदाजी करतानाचा तुझा अनुभव कसा होता? असा प्रश्न डूलने शमीला विचारला. त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत शमीने इंग्रजीतूनच आपल्या अनुभवाचं कथन केलं. 



शमीने ज्या अंदाजात या प्रश्नाचं उत्तर दिलं ते पाहता तिथे उपस्थित असणारा विराट कोहलीच नव्हे तर खुद्द डूलही आश्चर्यचकित झाला आणि त्याने शमीला चक्क हिंदीतून दाद दिली. 'युवर इंग्लिश बहुत अच्छा....' असं म्हणत त्याने शमीचं कौतुक केलं. क्रीडारसिकांमध्ये आणि सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून शमीवर कौतुकाचा वर्षावही सुरूच आहे.