माले : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग हा गेल्या काही दिवसांपासून भारतीय टीममधून बाहेर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युवराज मुंबईच्या टीमकडून खेळणार आहे. मुंबईच्या टीमनं निवड केल्यानंतर युवराज सिंगने मागच्या काही सामन्यांमध्ये फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. एअर इंडिया आणि मालदीवमध्ये झालेल्या सामन्यामध्ये युवराजनं रिव्हर्स स्वीप सिक्स मारला. एअर इंडिया आणि मालदीवच्या टीममध्ये मालेच्या एकुवेनी मैदानामध्ये ही मॅच खेळवण्यात आली. या मॅचसाठी आलेले बहुतेक प्रेक्षक हे युवराजची बॅटिंग बघण्यासाठीच आले होते. युवराजनंही या चाहत्यांना निराश केलं नाही.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये युवराज सिंग हा एअर इंडियाकडून खेळत होता. हा सामना मालदीवचं खेळ मंत्रालय, भारतीय दूतावास आणि मालदीव क्रिकेट बोर्ड यांनी संयुक्तरित्या या मॅचचं आयोजन केलं होतं. मालदीवच्या टीममध्ये मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह आणि उपराष्ट्रपती फैसल नसीमही होते. भारत आणि मालदीवमधलं नातं आणखी मजबूत करण्यासाठी क्रिकेटचा आधार घेतल्यामुळे मी आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया युवराज सिंगनं दिली.



३७ वर्षांचा युवराज सिंग या वर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणार आहे. २०१९च्या आयपीएल लिलावामध्ये मुंबईनं युवराजला १ कोटी रुपयांना विकत घेतलं. मागच्या वर्षी युवराज आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळला होता.