Temba Bavuma: यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये आता केवळ फायनल सामना खेळायचा बाकी आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वविजेते पदासाठी ही लढत होणार आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री केलीये. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं यंदाही वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने नेमकी चूक कुठे झाली, याची माहिती दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सामन्यानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?


ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तीन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. यानंतर दक्षिण आफ्रिका टीमचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला, “हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरं तर ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. त्यांना अंतिम फेरीसाठी शुभेच्छा. ऑस्ट्रेलियाची टीम आज खूप चांगली खेळली. 


बावुमा पुढे म्हणाला की, ज्या पद्धतीने आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीने सुरुवात केली, हाच सामन्याचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि तिथेच आम्ही खेळ हरलो होतो. जेव्हा तुम्ही 24/4 अशा स्कोरवर असता तेव्हा तुम्हाला स्पर्धात्मक स्कोर उभारण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मिलर आणि क्लासेन खेळताना आम्हाला गती मिळाली. मात्र दुर्दैवाने ते फार काळ टिकू शकला नाही. मिलरची खेळी शानदार होती. 


दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा पराभव


वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ईडन गार्डन्समध्ये खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघ 212 रन्स करू शकला. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमने शानदार फलंदाजी करत सामना 3 विकेट्सने जिंकला. या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेला आणखी एक निराशेचा सामना करावा लागलाय. सेमीफायनल पराभूत होऊन टीम पुन्हा एकदा वर्ल्डकप बाहेर पडलीये. 2015 मध्ये देखील दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.


सेमीफानयलमधील पराभवानंतर त्यांच्यावरील चोकर्सचा टॅग कायम राहिल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात कांगारूंनी साऊथ अफ्रिकेची विकेट काढली. त्यामुळे पाचव्यांदा साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग झालं. सामना अंतिम टप्प्यात आला अन् साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं.