World Cup : लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 100 रन्सने विजय मिळवत सेमीफायनलच्या शर्यतीतून इंग्लंडला बाहेर काढलंय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची कॅप्टन्स इनिंग्स पहायला मिळाली. रोहितने 87 रन्सची खेळी करत टीम इंडियाला 200 पार नेण्यास मदत झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 6 सामने जिंकून टीम इंडियाचे 12 पॉईंट्स झालेत. वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता टीम इंडियाला पुढील 3 सामन्यांपैकी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर गाठलंय. यावेळी रोहित शर्माने फलंदाजीमध्ये कमी पडल्याचं सांगितलं आहे. 


या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'हा असा सामना होता ज्यामध्ये आमच्या खेळाडूंनी त्यांचा सर्वोत्तम खेळ दाखवला. मला वाटतं या सामन्यात आम्ही खूप उत्साह दाखवला. सर्व अनुभवी खेळाडूंनी योग्य वेळी जबाबदारीने खेळ करत सामना जिंकला. आम्हाला माहित होतं की, आमची गोलंदाजी अनुभवी आहे, त्यामुळे आम्हाला चांगली धावसंख्या गाठायची होती. आम्ही सामना जिंकलो पण फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही. 


पहिल्या पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावणं ही चांगली परिस्थिती नव्हती. यावेळी तुम्हाला मोठ्या पार्टनरशिपची गरज होती. मात्र त्यानंतर आम्ही विकेट गमावल्या, ज्यामध्ये माझ्या विकेटचाही समावेश होता. या सामन्यात जवळपास 30 रन्सने मागे राहिल्याचं मला वाटलं, असंही रोहित शर्मा म्हणाला


रोहित शर्मा पुढे म्हणाला की, तीन विकेट्स लवकर गमावल्यानंतर पार्टनरशिप करणं आणि परिस्थितीनुसार खेळ करणं महत्त्वाचं होतं. पहिल्या 10 ओव्हरनंतर पार्टनरशिप करणं महत्त्वाचे होतं. तुम्हाला तुमचे शॉट्स न खेळता परिस्थितीनुसार खेळावं लागतं. नवीन बॉलला सामोरं जाणं थोडं आव्हानात्मक होतं. स्विंग आणि मूव्हमेंट मिळवत गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. गोलंदाजीत आमचा समतोल चांगला आहे.


टीम इंडियाचा इंग्लंडवर मोठा विजय


230 रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद झाले. यावेळी टीम इंडियाने 20 वर्षानंतर इंग्लंडचा वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) पराभव केला आहे.  धारदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील 6 वा विजय नोंदवला आहे. आता टीम इंडिया पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी विराजमान झालीये. टीम इंडियाकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 87 रन्स केले. तर मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 7 ओव्हरमध्ये 4 महत्त्वाच्या विकेट्स नावावर केल्या आहेत. तर बुमराहने (Jasprit Bumrah) 3 विकेट घेत इंग्लंडची कंबर मोडली.