Mamata Banerjee Post For Jay Shah : काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. चेअरमन पदी जय शाह यांची निवड बिन विरोध झाली असून त्यांच्या नियुक्तीसाठी पाकिस्तान सह सर्व देशांनी पाठिंबा दिला होता. जय शाह हे पाचवे भारतीय आहेत ज्यांनी आयसीसीच्या चेअरमन पदापर्यंत मजल मारली. जय शाह यांच्या नियुक्तीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास पोस्ट लिहून त्यांचे अभिनंदन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शह यांना उद्देशून ही पोस्ट लिहिली. त्यात ममता यांनी म्हंटले की, "अभिनंदन गृहमंत्रीजी! तुमचा मुलगा राजकारणी झाला नाही, पण ICC चेअरमन झाला आहे.  हे पद बहुतेक राजकारणातील पदांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे!!  तुमचा मुलगा खरोखरच खूप शक्तिशाली झाला आहे आणि त्याच्या या सर्वात उंच कामगिरीबद्दल मी तुमचे अभिनंदन करते!". 


ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या पोस्टवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी रिप्लाय करत म्हंटले, "दीदी, आयसीसी चेअरमन हे एक निर्वाचित पद आहे.  एखाद्या संस्थेचे नियंत्रण पुतण्याकडे किंवा मुलाकडे सोपवण्यापेक्षा हे वेगळे आहे याच्याशी तुम्हीही सहमत असाल असे वाटते. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की जय शाह हे 5 वे भारतीय आहेत ज्यांना जागतिक क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे".


जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण चेअरमन : 


35 वर्षांचे जय शाह हे आयसीसीचे सर्वात तरुण चेअरमन आहेत. शाह हे आयसीसीचे 16 वे चेअरमन असून त्यांच्यापूर्वी चेअरमन पदावर राहिलेल्या सर्व उमेदवाराचं वय हे 55 वर्षांहून अधिक होतं. 27 ऑगस्ट रोजी जय शाह यांची आयसीसीच्या चेअरमन पदी नियुक्ती झाली. शाह यांच्या विरुद्ध कोणीही अर्ज केला नव्हता म्हणून निवडणूक झाली नाही आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. सध्या आयसीसीचे चेअरमन असणाऱ्या ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ हा 30 नोव्हेंबरला संपणार आहे, ग्रेग बार्कले हे 2020 पासून या पदावर होते. 1 डिसेंबर 2024 रोजी जय शाह हे चेअरमन पदाची सर्व सूत्र हाती घेतील. 


आयसीसी चेअरमन होणारे जय शाह हे 5 वे भारतीय : 


जय शाह हे सध्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव आहेत. त्यांच्यानंतर अरुण जेटली यांचा मुलगा बीसीसीआयचा सचिव होऊ शकतो.  जय शाह यांच्यापूर्वी ४ भारतीयांनी आयसीसीचे चेअरमन पद भूषवले आहे. जगमोहन डालमिया यांनी 1997 ते  2000, शरद पवार यांनी 2010 ते 2012, एन श्रीनिवासन यांनी 2014 ते 2015 तर शशांक मनोहर हे 2015 ते 2020 दरम्यान आयसीसीचे चेअरमन होते.