वेस्टइंडिजचा कर्णधार Kireon Pollardने निवडले टी 20 मधील टॉप 5 खेळाडू, या दिग्गज भारतीयाचा समावेश
कायरन पोलार्डने (Kieron Pollard) या वर्ल्ड कपआधी टी 20 क्रिकेटविश्वातील स्वत:सह टॉप 5 खेळाडूंची निवड केली आहे.
यूएई : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता काही दिवस राहिले आहेत. या क्रिकेटच्या 'रन'संग्रामाला 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होत आहे. सर्व संघांनी आपल्या खेळांडूच्या नावाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या प्रकोपानंतर आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंसह चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियासह अनेक टीम्स या टी 20 वर्ल्ड कपच्या प्रबळ दावेदार समजल्या जात आहे. (west indies captain all rounder kieron pollard picked top 5 t20 player including former indian batsman ms dhoni)
यामध्ये वेस्टइंडिजचं नाव आघाडीवर आहे. विंडिज या स्पर्धेत कायरन पोलार्डच्या नेतृत्वात खेळणार आहे. पोलार्डने या वर्ल्ड कपआधी टी 20 क्रिकेटविश्वातील स्वत:सह टॉप 5 खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये आजी माजी खेळाडूंचा समावेश आहे.पोलार्डने आयसीसीसोबत बोलताना या फाईव्ह स्टार खेळाडूंची निवड केली आहे.
पोलार्डने स्वत:चा अपवाद वगळता स्टार खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये स्फोटक सलामीवीर, विकेटकीपर, एक ऑलराऊंडर (स्वत: पोलार्ड), फिरकीवर नाचवणारा स्पीनर आणि वेगवान गोलंदाज अशांचा समावेश केला आहे. यामध्ये 3 कॅरेबियन, 1 श्रीलंकन आणि 1भारतीय खेळाडूचा समावेश आहे.
ख्रिस गेल (Chris Gayle)
पोलार्डने या 5 खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकाची पसंती ही यूनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलला दिली आहे. गेलने एकूण टी 20 सामन्यांमध्ये 14 हजार 61 धावा चोपल्या आहेत. या दरम्यान त्याने 22 शतकं ठोकले आहेत. 175 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विंडिजने 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला. गेल या वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य होता.
लसिथ मलिंगा (Lasith Malinga)
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा यॉर्करकिंग माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने 295 सामन्यांमध्ये 390 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगाने काही दिवसांपूर्वी 15 सप्टेंबरला टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
सनील नरेन (Sunil Narine)
तिसऱ्या क्रमांकावर विंडिजचा फिरकीपटू सुनील नरेन आहे. सुनील हा आपल्या फिरकीवर गोलंजदाजांना नाचवतो. सुनीलच्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशन आहेत. कॅरम, गुगली आणि यासारख्या विविध चेंडू टाकण्याची क्षमता ही सुनीलमध्ये आहे. सुनील टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सुनीलमध्ये निर्णायक क्षणी बॅटिंग करुन संघाला विजय मिळवून देण्याचीही क्षमता आहे.
महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni)
पोलार्डने टीम इंडियाचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखणारा जाणारा महेंद्रसिंह धोनीला चौथ्या स्थानी स्थान दिलंय. धोनीला कर्णधारपदाचा प्रदीर्घ अनुभव आहेत. त्याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला टी 20, वनडे आणि चॅम्पियन ट्रॉफी या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धाचं विजेतेपद मिळवून दिलं आहे.
तसेच धोनीने टी 20 क्रिकेटमध्ये स्टंपमागे 269 फलंदाजांना बाद केलं आहे. यामध्ये 185 कॅच आणि 84 स्टंपिंग्सचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त धोनीने बॅटिंग करताना 34.54 च्या सरासरीने 6 हजार 861 धावा कुटल्या आहेत.
पोलार्डने अखेर शेवटी 5 व्या क्रमांकावर स्वत:ला ठेवलं आहे. पोलार्ड म्हणजे 'जिथे कमी तिथे आम्ही'. पोलार्ड बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी करतो. पोलार्डने आतापर्यंत अनेकदा अशक्य वाटणाऱ्या सामन्यांमध्ये स्वत:च्या जोरावर एकहाती सामना फिरवला आहे. पोलार्डने 298 सामन्यांमध्ये 298 विकेट्स घेतल्या आहेत.