टीम इंडियाची ती मॅच पुन्हा वादात, विंडिज खेळाडूंनी धक्कादायक माहिती दिल्याचा पाकिस्तानी खेळाडूचा आरोप
टीम इंडियाच्या खेळाडूंवर पुन्हा आरोप करण्यात येत आहेत.
मुंबई : २०१९ वर्ल्ड कप संपून वर्ष होत असलं तरी या स्पर्धेवरून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळू नये, म्हणून भारत इंग्लंडविरुद्धचा लीग स्टेजमधला सामना मुद्दाम हरल्याचा आरोप अजूनही पाकिस्तानी खेळाडूंकडून करण्यात येत आहे.
वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तान सेमी फायनलमध्ये नको असल्याचं वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू क्रिस गेल, जेसन होल्डर आणि आंद्रे रसेलने आपल्याला सांगितल्याचं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद म्हणाला आहे. वर्ल्ड कपदरम्यान मुश्ताक अहमद हा वेस्ट इंडिजच्या टीमचा सहाय्यक प्रशिक्षक होता.
'मी वर्ल्ड कपवेळी वेस्ट इंडिजचा सहाय्यक प्रशिक्षक होतो. इंग्लंडविरुद्धचा सामना भारत हरल्यानंतर गेल, रसेल आणि होल्डर यांनी भारताला पाकिस्तान सेमी फायनलमध्ये नको आहे, असं सांगितलं', असा दावा मुश्ताक अहमदने केला आहे.
भारत आणि इंग्लंडमधल्या मॅचनंतर वकार युनूस, अब्दुल रझाक आणि सिकंदर बख्त या पाकिस्तानी खेळाडूंनी आरोप केले होते. एमएस धोनी त्याची इच्छा असेल तेव्हा फोर आणि सिक्स मारू शकतो, पण तरीही त्याने या मॅचमध्ये स्वत:ला थांबवल्याचं अब्दुल रझाक म्हणाला होता.
पुन्हा का सुरू झाला वाद?
या सगळ्या वादाला बेन स्टोक्स याच्या 'ऑन फायर' या पुस्तकामुळे सुरुवात झाली. बर्मिंघममध्ये झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने भारताला विजयासाठी ३३८ रनचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा ३१ रनने पराभव झाला. २०१९ वर्ल्ड कपमधला भारताचा हा पहिलाच पराभव होता. यानंतर सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं.
बेन स्टोक्सने त्याच्या पुस्तकात याच मॅचवरून धोनीच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले. त्या मॅचमधल्या धोनीच्या संथ खेळामुळे मी चक्रावून गेलो, असं स्टोक्स म्हणाला. इंग्लंडच्या ३३८ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात १३८ रनचं पार्टनरशीप झाली. पण रोहित, विराट आणि हार्दिक पांड्याची विकेट गेल्यानंतर भारताची गती मंदावली. शेवटच्या ११ ओव्हरमध्ये ११२ रनची गरज असतानाही धोनीच्या खेळीने मला धक्का बसल्याचं स्टोक्स म्हणाला.
वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी मात्र या वादावरून स्टोक्सवर निशाणा साधला आहे. हेडलाईनमध्ये येण्यासाठी लोकं आजकाल काहीही लिहितात. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये भारताची तशी काही रणनिती नव्हती, असं होल्डिंग म्हणाले आहेत.