मुंबई : पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिज (West Indies team) संघाने कोरोनामुळे मालिका लवकर संपवण्याचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेनंतर संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार होता पण आता ते न खेळताच परतणार आहे. वेस्ट इंडिज संघाचे तीन खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पाकिस्तानचा दौरा थांबवला गेलाय.(Pakistan vs west indies)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा तडाखा बसलेल्या वेस्ट इंडिज संघाने बुधवारी टी-20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला. यानंतर संघ व्यवस्थापन आणि बोर्डाने एकदिवसीय मालिका तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 18, 20 आणि 22 डिसेंबर रोजी होणारे सामने पुढील वर्षी जूनमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


विकेटकीपर शाई होप, डावखुरा फिरकीपटू अकिल हुसेन आणि अष्टपैलू जस्टिन ग्रीव्हज यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या ताज्या चाचण्यांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळले. सहाय्यक प्रशिक्षक रेडी एस्टविक आणि टीमचे डॉक्टर अक्षय मानसिंग यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजच्या म्हणण्यानुसार, तिन्ही खेळाडू आगामी सामना खेळू शकणार नाहीत आणि पाचही व्यक्ती क्वारंटाईनमध्ये राहतील. वैद्यकीय अधिकारी त्यांची देखभाल करतील. 


आता वेस्ट इंडिजचे सहा खेळाडू कोरोना संसर्गाचे बळी ठरले आहेत तर डेव्हन थॉमस बोटाला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पाकिस्तानने तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याआधी वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल आणि अष्टपैलू रोस्टन चेस आणि काइल मायर्स यांनाही कोरोना संसर्गामुळे टी-20 मालिकेतून वगळण्यात आले होते.