West Indies vs India R Ashwin Record: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बुधवारपासून कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. अश्विनने या सामन्यामध्ये 5 गड्यांना तंबूत पाठवलं. या सामन्यात तिसरी विकेट घेताच अश्विनने 700 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अश्विनने हा पराक्रम करुन खास पंक्तीत स्थान मिळवलं आहे. यापूर्वी 700 विकेट्स घेण्याचा पराक्रम केवळ हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे या दोघांना करता आला आहे. 700 विकेट्स घेणारा अश्विन हा तिसरा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.


भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय भारतीय फिरकीपटूंनी चुकीचा ठरवला. लंच ब्रेकपर्यंत यजमान संघाची स्थिती 68 ला 4 गडी बाद अशी होती. या सामन्यामध्ये भारतीय फिरकीपटूंनी यजमानांना अवघ्या 150 धावांमध्ये तंबूत पाठवलं. त्यानंतर भारतीय संघाने दिवस संपण्याआधी बिनबाद 80 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी 24.3 षटकांची गोलंदाजी करुन अश्विनने वेस्ट इंडिजच्या 5 खेळाडूंना तंबूत पाठवलं. रविंद्र जडेजाने अश्विनला चांगली साथ दिली. त्याने 14 षटकांमध्ये 26 धावा देत 3 गड्यांना तंबूत पाठवलं. शार्दुल ठाकूर आणि सिराजने प्रत्येकी एक गडी तंबूत पाठवला. घेतली.


कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा खेळाडू


वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अश्विनने सर्वात आधी टेगेनारिन चंद्रपॉलला बाद केलं. यानंतर अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात कर्णधार क्रेग ब्रेथवेट अडकला. अल्जारी जोसेफ हा अश्विनच्या फिरकीत गुंडाळला गेलेला तिसरा खेळाडू ठरला. अल्जारीला बाद करत अश्विनने कसोटीमधील 477 वा बळी घेतला. अश्विन त्याच्या करिअरमधील 93 वा कसोटी सामना खेळत आहे. अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. अश्विन हा अनिल कुंबळेनंतर कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.  पहिल्या स्थानावर अनिल कुंबळे असून त्याने 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 बळी घेतले आहेत. कुंबळेने 35 वेळा 5 गड्यांना तंबूत पाठवण्याचा पराक्रम केला आहे. तर अश्विन सध्या 93 वी कसोटी खेळत असून त्याने आतापर्यंत 479 बळी घेतले असून एकूण 33 वेळा 5 गड्यांना बाद केलं आहे. 


फलंदाजीमध्येही उत्तम


केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीमध्येही अश्विनने कसोटी क्रिकेटवर आपली छाप सोडली आहे. अश्विनने भारतीय संघाकडून खेळताना 4 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा आणि 700 बळी घेणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. भारताकडून खेळताना सर्वाधिक बळी घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये अनिल कुंबळे पहिल्या स्थानी आहे. त्याने 956 बळी घेतले आहेत. तर हरभजन सिंग या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्याने एकूण 711 बळी घेतले आहेत.