Ind Vs Sa:असं काय घडलं की विराट कोहली भर मैदानात संतापला?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे.
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 111 धावांची गरज असून आठ विकेट शिल्लक आहेत. खेळाच्या चौथ्या दिवशी चाहत्यांना टीमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र खेळाच्या तिसऱ्या दिवशी डीआरएसवरून मोठा वाद झालेला दिसून आला.
21व्या ओव्हरमध्ये रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला एलबीडब्ल्यू आऊट केलं. मैदानात असलेल्या अंपायरने भारताच्या बाजूने निर्णय दिला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने लगेच डीआरएस रिव्ह्यू घेतला. यानंतर, रिप्लेमध्ये बॉल विकेटच्या लाईनवर त्याच्या गुडघ्याच्या खाली लागत असल्याचं दिसतं.
सहसा अशा परिस्थितीत फलंदाजाला नॉटआऊट दिलं जात नाही. परंतु बॉल ट्रॅकिंगनुसार, बॉल स्टंपच्या वरून जात होता. त्यामुळे थर्ड अंपायरने डीन एल्गरला नॉटआऊट दिलं.
यानंतर खेळाडूंना राग येणं स्वाभाविक होतं. कारण एका एँगलने पाहिल्यास चेंडू विकेटला लागला असता आणि एल्गर आऊट झाला असता. यावर प्रथम अश्विनने संताप व्यक्त करत 'सुपरस्पोर्टने जिंकण्यासाठी इतर मार्ग शोधले पाहिजेत' असं सांगितलं. सुपरस्पोर्ट अधिकारी एक दक्षिण आफ्रिकन ब्रॉडकास्टर आहे.
यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली स्टंपच्या मायक्रोफोनमध्ये म्हणाला, 'फक्त विरोधी टीमवरच नाही तर तुमच्या टीमवरही लक्ष केंद्रित करा. संपूर्ण देश 11 खेळाडूंविरुद्ध एकत्र खेळत आहे.
दरम्यान दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही डीआरएसवर प्रश्न उपस्थित केलेत. गावस्कर म्हणाले, ''बॉल एल्गरच्या गुडघ्याला लागला, त्याची उंची इतकी नाही, त्यामुळे चेंडू स्टंपच्या वर जाईल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं की बॉल बेल्स क्लिप करेल आणि अंपायर कॉल राखला जाईल."