कोहली `गोल्डन डक` तर केन विलियम्सन `डायमंड डक` चा शिकार, काय नेमका यातील फरक?
कालच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंच्या टीम आमनेसामने आल्या होत्या. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही.
मुंबई : क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमध्ये विराट कोहली आणि केन विलियम्सनचं नाव घेतलं जातं. मात्र सध्या आयपीएलमध्ये यो दोन्ही खेळाडूंची कामगिरी अत्यंत वाईट दिसून आली आहे. या दोघांवरही सातत्याने टीका करण्यात येतेय. तर कालच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंच्या टीम आमनेसामने आल्या होत्या. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या 'गोल्डन डक'ला बळी पडला, तर हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन 'डायमंड डक'वर बाद झाला. आयपीएलच्या या सिझनमध्ये कोहलीला तिसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलंय. आयपीएलच्या इतिहासात एकूण सहाव्यांदा तो अशाप्रकारे बाद झाला आहे.
चाहत्यांना विराट कोहलीकडून आशा असताना त्याने पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आहे. आयपीएलमध्ये 14 वर्षानंतर विराट कोहली असा आउट झाला. यापूर्वी 2008 मध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध आशिष नेहराने त्याला गोल्डन डकवर आऊट केलं होतं.
दुसरीकडे केन विलियम्सननेही चाहत्यांची निराशा केली. विलियम्सन हा डायमंड डकचा बळी ठरला. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने गोलंदाजीला सुरुवात केली. मॅक्सवेलच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्माने कव्हरच्या दिशेने शॉट मारला. यावेळी तिथे असलेल्या शाहबाज अहमदने विकेटकडे थ्रो केला आणि केन एकंही बॉल न खेळता माघारी परतला.
‘गोल्डन डक’ आणि ‘डायमंड डक’ मध्ये काय फरक?
जेव्हा एखादा फलंदाज पहिल्याच बॉलवर एकंही रन न करता आऊट होतो तेव्हा त्याला क्रिकेटच्या भाषेत 'गोल्डन डक' म्हणतात. तर जेव्हा फलंदाज कोणताही बॉल न खेळता विकेट गमावतो तेव्हा त्याला 'डायमंड डक' म्हणतात.