`म्हणून विराटची वनडेमध्ये ३० शतकं`
भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन यांच्यामध्ये सध्या सर्वश्रेष्ठ कोण आहे, याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये नेहमीच चर्चा रंगते.
चेन्नई : भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन यांच्यामध्ये सध्या सर्वश्रेष्ठ कोण आहे, याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. ऑस्ट्रेलिया सध्या भारत दौऱ्यावर आहे. याबाबत खुद्द स्टिव्ह स्मिथनं भाष्य केलं आहे.
भारत जास्त वनडे क्रिकेट खेळत असल्यामुळे विराट कोहलीच्या वनडेमध्ये ३० शतकं आहेत, असं स्टिव्ह स्मिथ म्हणालाय. वैयक्तिक रेकॉर्डसाठी नाही तर मॅच आणि सीरिज जिंकण्यासाठी मी खेळतो, असं वक्तव्य स्मिथनं केलं आहे. विराट कोहली हा उत्तम खेळाडू असल्याची पावतीही स्मिथनं दिली आहे.
१९५ वनडेमध्ये विराट कोहलीची ३० शतकं आहेत, तर स्मिथनं ९९ वनडेमध्ये ८ शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीनं शतकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. रिकी पाँटिंगच्या नावावर वनडेत ३० शतके होती.
या यादीत सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरनं ४५२ इनिंग्समध्ये ४९, रिकी पाँटिंगनं ३६५ इनिंगमध्ये ३० तर विराटनं फक्त १८६ इनिंगमध्येच ३० शतकं पूर्ण केली आहेत.