गांगुलीचा तो निर्णय आणि धोनीची कारकिर्दच बदलली
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीनं अनेक क्रिकेटपटू घडवले.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीनं अनेक क्रिकेटपटू घडवले. म्हणूनच दादाची गणना भारतीय क्रिकेटमधला सर्वोत्तम कर्णधार म्हणून होते. गांगुलीच्या एका निर्णयामुळे धोनीची कारकिर्दच बदलली. २००४ साली गांगुली कर्णधार असताना धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. बांगलादेशविरुद्ध चिटगाँगमध्ये धोनी त्याची पहिली मॅच खेळला. धोनी त्याच्या वनडे कारकिर्दीतल्या पहिल्या दोन मॅच सातव्या क्रमांकावर खेळला. यानंतर विशाखापट्टणममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही धोनी सातव्या क्रमांकावरच खेळेल, असं आधीच्या दिवशी टीमच्या बैठकीत ठरवण्यात आलं होतं, असं गांगुली म्हणाला.
धोनी सातव्या क्रमांकावर खेळणार हे ठरलं होतं तरी त्याला चांगला खेळाडू कसं बनवायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता. मॅचच्या आधीच्या दिवशी रात्री मी याबद्दल विचार केला. पाकिस्तानविरुद्धच्या त्या मॅचमध्ये आम्ही टॉस जिंकला आणि धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचं मी ठरवलं. या मॅचमध्ये तुला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला जायचं आहे असं मी धोनीला सांगितलं. तेव्हा त्यानं तू कुठे बॅटिंग करणार असा प्रश्न मला विचारला. मी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला जाईन पण तू तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग कर असं मी धोनीला सांगितल्यी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली. गौरव कपूरच्या ब्रेक फास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमामध्ये गांगुलीनं धोनीबद्दलचा हा किस्सा सांगितला.
गांगुलीनं घेतलेला हा निर्णय योग्य ठरला आणि धोनीनं या मॅचमध्ये १४८ रनची खेळी केली. धोनीच्या खेळीमध्ये १५ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. या मॅचमध्ये भारताचा ५८ रननी विजय झाला होता आणि धोनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं. धोनीच्याच नेतृत्वात भारतानं २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप, २०११ सालचा वर्ल्ड कप आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.