नवी दिल्ली : भारताचा फास्ट बॉलर ईशांत शर्मानं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचनंतर मी एक दिवस नाही तर तब्बल १५ दिवस रडलो, असं ईशांत शर्मा म्हणाला आहे. माझ्या कारकिर्दीमधला तो सगळ्यात मोठा आघात होता, असं ईशांतनं सांगितलं. २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना मोहालीमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतानं पहिले बॅटिंग करताना ३०३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या १८ बॉलमध्ये विजयासाठी ४४ धावांची गरज होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचची ४७वी ओव्हर टाकायला ईशांत शर्मा आला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा जेम्स फॉकनर बॅटिंग करत होता. फॉकनरनं ईशांतच्या या ओव्हरमध्ये ४, ६, ६, २, ६, ६ अशा एकूण ३० रन केल्या. ऑस्ट्रेलियाला त्यामुळे १२ बॉलमध्ये विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियानं हा सामना ४ विकेट राखून जिंकला.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कामगिरीनंतर ईशांत शर्मावर चौफेर टीका झाली होती. मॅच गमावल्याचा गुन्हेगार ठरवल्यामुळे आपली काय अवस्था झाली होती, याबद्दल ईशांत शर्मानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.


तो पहिला दिवस होता, जेव्हा मी रडलो. फक्त १ दिवस नाही तर १५ दिवस मी रडतच होतो. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतला तो सगळ्यात मोठा आघात होता. त्या ओव्हरमध्ये मी ३० धावा दिल्या. या ओव्हरला मी फॉकनर ओव्हर म्हणतो, असं वक्तव्य ईशांत शर्मानं केलं. मी स्वत:मधल्या कमजोरीकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. मी भारतासाठी मॅच गमावली होती. माझ्या कारकिर्दीतला तो सगळ्यात खराब दिवस असल्याचं ईशांत म्हणाला. 


ऑस्ट्रेलियाविरुद्धचा त्या मॅचनंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. पण पत्नी प्रतिमा सिंग आणि मित्र राजीव महाजन यांनी मला या डिप्रेशनमधून बाहेर काढलं. तेव्ही मी प्रतिमासोबत डेट करत होतो. ती मला म्हणाली- तू दोनच गोष्टी करू शकतोस, एकतर घरी बस किंवा बाहेर पड आणि मेहनत कर, असं ईशांतनं सांगितलं. प्रतिमानं दिलेला हा सल्ला सामान्य असला तरी मला डिप्रेशनमधून बाहेर पडायला मदत झाल्याचं वक्तव्य ईशांतनं केलं.


२०१३ सालच्या त्या मॅचबद्दल ईशांतची पत्नी प्रतिमानंही प्रतिक्रिया दिली आहे. मी ती मॅच बघितली नाही. पण ईशांतनं एका ओव्हरमध्ये ३० धावा दिल्याचं मला कळलं, तेव्हा मी ईशांतला मेसेज तेला. ईशांतनं काहीच रिप्लाय दिला नाही. यानंतर मी ईशांतशी बोलले. क्रिकेटच सगळं नाही, आयुष्य खूप मोठं आहे. क्रिकेटला डोक्यावर बसवून ठेवू नकोस, असं मी ईशांतला सांगितल्याचं त्याची पत्नी प्रतिमा म्हणाली.


प्रतिमा सिंग ही बास्केटबॉलची आंतरराष्ट्रीय खेळाडू होती. त्यामुळे तिनं खेळ आणि खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं. खेळाला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. यामुळे तुमच्यावर दबाव वाढेल, आणि त्यामुळे तुम्ही आयुष्याचा आनंद घेऊ शकणार नाही. तुम्हाला आयुष्याचा आनंद घेता येत नसेल, तर तुम्ही चांगला खेळही करू शकत नाही, असा सल्ला प्रतिमा सिंगनं दिला आहे.


ईशांत शर्मा नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत भारतात आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. या मालिकेत ईशांतनं भारतीय फास्ट बॉलिंगच्या आक्रमणाचं नेतृत्व केलं. ऑस्ट्रेलियातल्या कामगिरीमुळे आपण खुश असल्याचं ईशांतनं सांगितलं.