जकार्ता : भारताच्या स्वप्ना बर्मननं आशियाई स्पर्धेत हेप्टेथलॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. आशियाई खेळांमध्ये या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी स्वप्ना पहिली भारतीय आहे. स्वप्नाच्या या यशाचं श्रेय साई (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला आहे. स्वप्नाचे प्रशिक्षक सुभाष सरकार यांनी हे वक्तव्य केलं आहे. स्वप्ना बर्मनची प्रतिभा बघून राहुल द्रविडनं स्वप्नाला मदत केली. राहुल द्रविज अॅथलीट मेंटरशीप प्रोग्रॅमच्या माध्यमातून स्वप्नाला मदत करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्नासोबतच आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या १९ भारतीय खेळाडूंना राहुल द्रविड अॅथलीट मेंटरशीप प्रोग्रॅमच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येतेय. आर्थिक सहाय्यासोबतच राहुल द्रविडनं या खेळाडूंना मार्गदर्शनही केलं आहे.


राहुल द्रविड अॅथलीट मेंटरशीप प्रोग्रॅम गो स्पोर्ट्ससोबतच्या भागीदारीबरोबर आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्या योग्य करण्यासाठी मदत केली जाते. याआधी दीपा करमाकर, किडंबी श्रीकांत आणि एचएस प्रणोय यांनाही या प्रोग्रॅमच्या माध्यमातून तयार करण्यात आलं आहे.


दोन्ही पायांना सहा बोटं... स्वप्नाला गरज खास बुटांची


हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये महिला खेळाडू स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदकावर कब्जा मिळवला... स्वप्नानं सात इव्हेंटमध्ये एकूण 6026 अंकांसोबत पहिलं स्थान मिळवलं. स्वप्नानं उंच उडी (1003 अंक), भाला फेक (872 अंक) मध्ये पहिला तसंच गोळा फेक (707 अंक) आणि लांब उडी (865 अंक) दुसरा क्रमांक मिळवला. अतिशय गरिब परिस्थितीतून आलेल्या स्वप्नावर एक वेळ अशीही आली होती जिथे चांगले स्पोर्टस शूज घेण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला... स्वप्नाच्या दोन्ही पायांना सहा बोटं आहेत. पायाची रुंदी जास्त असल्या कारणानं खेळांदरम्यान स्वप्नाच्या अडचणी वाढत होत्या. या कारणानं तिचे बूट दीर्घकाळ टीकतदेखील नाहीत.


यावर बोलताना, 'मी इतर लोक वापरतात ते सामान्य बूट परिधान करते. प्रॅक्टीस दरम्यान या बुटांचा त्रास होत होता' असं स्वप्नानं म्हटलंय. यावर, एखाद्या कंपनीनं तुझ्यासाठी खास बूट बनवावेत असं वाटतं का? असा प्रश्न तिला विचारला तेव्हा... 'निश्चितच, त्यामुळे माझ्यासाठी सोपं होईल' असं स्वप्नानं म्हटलंय.


या खेळादरम्यान स्वप्नानं तिच्या गालावर एक पट्टी लावली होती... त्याबद्दल विचारल्यावर तिनं आपल्याला दातदुखीचा दोन दिवसांपासून त्रास होत असल्याचंही सांगितलं... त्रास वाढत होता, पण मेहनत वाया जाऊ नये, अशीही इच्छा होती... त्यामुळे दातदुखी विसरून मी खेळले, असं स्वप्नानं म्हटलंय. 


एशियाडच्या हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी स्वप्ना पहिला महिला खेळाडू आहे. उत्तर बंगाच्या जलपाईगुडी शहारच्या एक झोपडीवजा घरात राहणाऱ्या या कुटुंबातील एका मुलीनं ही कामगिरी करून दाखवलीय. स्वप्नाचे वडील पंचन बर्मन रिक्षा चालवतात... परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी अंथरुण धरलंय. 'आम्ही कधीही स्वप्नाच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही... परंतु, तिनं मात्र कधीही याबद्दल तक्रार केली नाही' असं स्वप्नाच्या आईनं भावूक होत म्हटलं.