मुंबई : आयपीएल 2022पूर्वी खेळाडूच्या रिटेंशनची सर्वत्र चर्चा आहे. सध्या खेळत असलेल्या 8 टीम्सना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं 30 जानेवारीपर्यंत द्यायची आहेत. दरम्यान, लखनऊ फ्रँचायझीवर मोठ्या रकमेचा हवाला देऊन इतर संघातील खेळाडू आपल्याकडे वळवण्याचा आरोप आहे. यामध्ये राशिद खान आणि केएल राहुल यांना ऑफर देण्यात आल्या असल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यासंदर्भात पंजाब आणि हैदराबाद टीम्सकडून बीसीसीआयला तक्रार करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला लिलावापूर्वी त्याच्या पैशांबाबत इतर संघांशी मोलभाव करण्यास मनाई आहे. अशा प्रकरणांमध्ये खेळाडूला बंदीच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. अशीच कारवाई सीएसकेचा खेळाडू रवींद्र जडेजावर करण्यात आली होती.


2010 साली रविंद्र जडेजावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी जडेजावर एका आयपीएल सीझनची बंदी घालण्यात आली होती.


रवींद्र जडेजा 2008 मध्ये आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स टीमचा हिस्सा होता. पण 2010 च्या आयपीएलपूर्वी जडेजाने आयपीएलमधील खेळाडूंशी संबंधित गाईडलाईन्स मोडल्याचं समोर आलं होतं. यानंतर जडेजाच्या विरोधात तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर चौकशीही झाली. यामध्ये जडेजाला दोषी ठरवण्यात आलं होतं.


त्यावेळी रॉयल्सशी करार असतानाही जडेजाने इतर फ्रँचायझींशी जास्त रकमेसाठी बोलल्याचं सांगण्यात आलं होतं. राजस्थान रॉयल्स जडेजाला आयपीएल 2010 पर्यंत आपल्यासोबत ठेवू इच्छित होती. मात्र जडेजाला 2009 पर्यंतच राहायचं होतं. अशात त्याने इतर टीमशी संपर्क साधला होता.


असं करून जडेजाने नियम मोडला कारण रॉसल्सने त्याला सोडलं असतं तरच तो असं करू शकला असता. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून एक निवेदन आलं होतं की, जडेजाने मुंबई इंडियन्सच्या प्रतिनिधींशी संपर्क केला होता. त्याला त्याच्या कराराची कागदपत्रं दिली आणि मुंबई इंडियन्सची कागदपत्रेही घेतली. यानंतर रवींद्र जडेजावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.