मुंबई : महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती. या खेळीमुळेच भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. हरमनप्रीतबरोबरच भारतीय टीमवर सध्या बक्षिसांचा वर्षाव होत आहे. पण जेव्हा हरमनप्रीतला मदतीची गरज होती तेव्हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं तिची मदत केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००९ पासून हरमनप्रीत भारताकडून क्रिकेट खेळत आहे. २०१०-११मध्ये हरमनप्रीतला नोकरीची आवश्यकता होती. नोकरीसाठी खटपट करणाऱ्या हरमनप्रीतच्या मदतीला मग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर धावून आला होता. राज्यसभेचा खासदार असलेल्या सचिननं हरमनप्रीतच्या नावाची शिफारस रेल्वे मंत्रालयाला केली होती. यानंतर हरमनप्रीतला पश्चिम रेल्वेमध्ये नोकरी लागली होती. मागच्या चार वर्षांपासून हरमनप्रीत रेल्वेमध्ये काम करत आहे.


रेल्वेमध्ये नोकरी मिळण्याआधी हरमनप्रीतनं पंजाब पोलिसांमध्येही नोकरीसाठी प्रयत्न केले होते. पण पंजाबच्या पोलीस खात्याकडून हरमनप्रीतची खिल्ली उडवण्यात आली होती. हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का असा सवाल पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यानं विचारल्याचं हरमनप्रीतचे प्रशिक्षक यादविंदरसिंह सोधी यांनी सांगितलं आहे.