Kapil Dev Underworld Don Dawood Ibrahim: भारतामधील मोस्ट वॉण्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला क्रिकेटमध्ये विशेष रस आहे. मॅच फिक्सिंग असो किंवा प्रत्यक्षात मैदानात बसून फोनवर बोलतानाचा दाऊदचा फोटो असो तो क्रिकेटमुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. शारजाहच्या मैदानामध्ये पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये फोनवर बोलतानाचा दाऊदचा फोटो तुम्ही अनेकदा पाहिला असेल. अशाच एका क्रिकेट सामन्यामध्ये दाऊद इब्राहिम चक्क भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये शिरला होता. त्यावेळेस 1883 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे कपिल देव भारताचे कर्णधार होते. दाऊद इब्राहिम भारतीय ड्रेसिंग रुममध्ये शिरल्यानंतर नक्की काय घडलं होतं याबद्दलचा किस्सा दिलीप वेंगसरकर यांनी सांगितला होता. त्यावेळेस दिलीपही भारतीय संघातील सदस्य असल्याने त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम प्रत्यक्ष अनुभवला आहे.


नेमकं घडलेलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1986 साली भारतीय संघ शारजाहच्या मैदानामध्ये सामना खेळण्यासाठी आला होता. सामना सुरु होण्याआधी दाऊद इब्राहिम भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आला. दाऊद इब्राहिम प्रसिद्ध अभिनेते मेहबूब यांच्याबरोबर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये शिरला. मेहबूब यांनी दाऊदची ओळख भारतीय उद्योजक अशी करुन दिली. दाऊदने फार वेळ न घेता थेट भारतीय संघातील खेळाडूंना ऑफर दिली. "जर भारतीय संघ अंतिम सामना जिंकला तर संघामधील प्रत्येक खेळाडूला मी टोयोटा कोरोला कार भेट म्हणून देईन," असं दाऊदने संघातील खेळाडूंसमोर जाहीर केलं.


दाऊद इब्राहिमची ती ऑफर ऐकून खेळाडू गोंधळले


दाऊदने दिलेली ऑफर ऐकून सर्व भारतीय खेळाडू गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. नेमकं काय बोलावं कोणाला काहीच कळत नव्हतं. तितक्यात भारतीय कर्णधार कपिल देव हे पत्रकार परिषद संपवून ड्रेसिंग रुममध्ये परतले. कपिल देव यांना ड्रेसिंग रुममध्ये भारतीय क्रिकेटपटूंशिवाय कोणीही प्रवेश केलेला आवडत नसेल. त्यामुळे कपिल देव रुममध्ये प्रवेश करताच सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरील ताण निवळला.


कपिल दाऊदला नेमकं काय म्हणाले?


कपिल यांनी पहिल्यांदा अभिनेते मेहबूब यांच्याकडे पाहिलं. कपिल मेहबूब यांना ओळखत होते. त्यांनी अगदी आदराने, "मेहबूब साहाब, ड्रेसिंग रुममध्ये बाहेर या," असं म्हटलं. त्यानंतर कपिल देव यांनी दाऊद इब्राहिमला पाहिलं. पण ते दाऊदला पहिल्यांदाच पाहत होते. त्यांनी मेहबूब यांना ओळखलं त्याप्रमाणे दाऊद त्यांना अनोळखीच होता. दाऊदवर नजर पडताच कपिल देव यांनी त्यांच्याकडे पाहत, "हा माणूस कोण आहे? चल इथून बाहेर निघ!" असं म्हटलं. 


'शारजाह ड्रेसिंग रुम स्कॅण्डल' ओळखळा जातो हा किस्सा


कपिल देव यांचा आक्रमक अवतार पाहून दाऊद इब्राहिम काहीही न बोलता मान खाली घालून शांतपणे भारतीय ड्रेसिंग रुममधून बाहेर पडला. दिलीप वेंगसरकर वगळता कोणीच दाऊदला ओळखलं नाही. नंतर अनेक वर्षांनी दाऊद इब्राहिम हा 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील प्रमुख आरोपी असल्याची माहिती समोर आल्यानंतर हा किस्सा नव्याने सगळीकडे सांगितला जाऊ लागला. हा किस्सा आता, 'शारजाह ड्रेसिंग रुम स्कॅण्डल' म्हणून ओळखला जातो.