डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधली पहिली वनडे गुरुवारी डरबनमध्ये होईल. टेस्ट सीरिजमध्ये २-१नं पराभव झाल्यानंतर वनडे सीरिजमध्ये बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमची निवड करणं कॅप्टन विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आफ्रिकेच्या जलद विकेटवर स्पिनरपेक्षा फास्ट बॉलरनाच जास्त संधी मिळेल हे निश्चित आहे. स्पिनरपैकी युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि अक्सर पटेल हे पर्याय विराटपुढे असतील. चहल आणि कुलदीप यांची निवड निश्चित मानली जात आहे. पण एकच स्पिनर खेळवायचा असेल तर मात्र विराटला कठीण जाईल.


फास्ट बॉलरमध्ये विराट भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि बुमराहला मैदानात उतरवेल. तर हार्दिक पांड्या प्रत्येक मॅच खेळेल हे निश्चित आहे. या चार बॉलरसोबत एक स्पिनर घेतला तर एक बॅट्समन कमी घेऊन मैदानात उतरावं लागेल.


मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहलीकडे श्रेयस अय्यर हा पर्याय आहे. तसंच मनीष पांडे, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी दोघांची टीममध्ये निवड होऊ शकते.


ओपनिंगसाठी शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोनच पर्याय विराट कोहलीकडे सध्या आहेत. अजिंक्य रहाणे सध्या तिसरा ओपनर म्हणून विराटपुढचा पर्याय आहे. किती बॅट्समन आणि किती बॉलर घ्यायचे हे ठरवताना विराटची अडचण होणार आहे. जलद खेळपट्टीची शक्यता असल्यामुळे भारत ६ बॅट्समन, एक ऑल राऊंडर(पांड्या), एक स्पिनर आणि ३ फास्ट बॉलर घेऊन मैदानात उतरेल, असं बोललं जातंय.


डरबनमधल्या या मॅचमध्ये टॉस महत्त्वाची भूमिका बजावेल. टेस्ट सीरिजमध्ये भारताला सुरुवातीला नेहमीच धक्के बसले. त्यामुळे टॉस जिंकून बॅटिंग घेतली तर पहिले बचावात्मक खेळ करून चांगला स्कोअर करण्याचं आव्हान विराट ब्रिगेडपुढे असेल.