मुंबई : यंदाची आयपीएल आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मात्र प्लेऑफचं चित्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. प्लेऑफमध्ये चौथी टीम कोणती असणार याकडे अजून सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. चौथ्या जागेसाठी प्रामुख्याने तीन टीम आहेत. यामध्ये कोलकाता नाइटरायडर्स, मुंबई इंडियन्स और पंजाब किंग्स या टीम्सचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान प्लेऑफमध्ये चौथी टीम कोणती पोहोचणार हा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या टीमवर अवलंबून आहे. संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये आजचा सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. 


आतापर्यंत सर्व टीम्स आयपीएल 2021 मध्ये 13-13 सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स (20), चेन्नई सुपर किंग्ज (18) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (16) पहिल्या तीन स्थानांवर आहेत. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (12) आणि मुंबई इंडियन्स (12) चौथ्या स्थानाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे प्रत्येकी 10 गुण आहेत. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि त्याचे केवळ 6 गुण आहेत.


आयपीएल 2021 मध्ये आज दोन सामने आहेत. पहिला सामना चेन्नई आणि पंजाब यांच्यात आहे. तर दुसरा सामना कोलकाता विरुद्ध राजस्थान असा रंगणार आहे. जर कोलकाता हा सामना जिंकला, तर त्याचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल. मात्र, त्यांचा विजय होऊनही मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहील. 


कोलकाताच्या विजयानंतरही, जर मुंबईला प्लेऑफचं तिकीट हवं असेल, तर उद्या हैदराबादला सुमारे 70 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत करावं लागेल किंवा 10 षटकांत लक्ष्य साध्य करावं लागेल. कोलकात्याने आज मोठ्या विजयाची नोंद केली तर मुंबईकडे जाण्याचा रस्ता अधिक कठीण होईल.


दुसरीकडे राजस्थानने कोलकाताला पराभूत केलं तर मुंबई इंडियन्सचं काम सोपे होईल. मग मुंबईला फक्त हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकावा लागेल. त्याचप्रमाणे आज राजस्थानने विजय मिळवला तर पंजाबचा संघही काही प्रमाणात शर्यतीत सहभागी होईल. त्यामुळे कुठेतरी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या चाव्या या राजस्थान रॉयल्सकडे असल्याच्या चर्चा आहेत.


प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठीची शर्यत अधिकंच रोमांचक राहणार आहे. जर कोलकाता जिंकली तर फक्त मुंबईच या शर्यतीत टिकेल आणि त्यासाठीचा मार्गही कठीण असेल. मात्र यामुळे पंजाबच्या प्लेऑफच्या आशा पूर्णपणे चक्काचूर होतील.