IPL | विराटनंतर RCBचं नेतृत्व कोणाकडे? या तिघांच्या नावाची चर्चा
विराट कोहलीने ( Virat Kohli) 19 सप्टेंबरला आयपीएलच्या 14 व्या हंगामानंतर (IPL 2021) कॅप्टन्सी (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.
यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात बंगळुरुने (RCB) प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. या 14 व्या मोसमानंतर विराट कोहली बंगळुरुच्या कर्णधार पदावरुन पायऊतार होणार आहे. विराटने 19 सप्टेंबरला 14 व्या हंगामानंतर कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. विराटने 7 वर्ष बंगळुरुची धुरा सांभाळली. मात्र विराटला आपल्या टीमला ट्रॉफी जिंकून देता आली नाही. (Who will lead RCB after Virat Kohli leaves the captaincy any one of the 3 players is likely be to lead in ipl)
विराटचा कर्णधार म्हणून हा अखेरचा हंगाम असणार आहे. त्यामुळे विराटचा आपल्या नेतृत्वात संघाला ट्रॉफी जिंकून देण्याचा मानस असणार आहे. विराट कॅप्टन्सी सोडणार असल्याने कर्णधारपदाची सूत्र कोणाला मिळणार, याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. कर्णधारपदासाठी बंगळुरुच्या 3 स्टार फलंदाजांच्या नावाची चर्चा आहे.
एबी डीव्हीलियर्स (ab de villiers)
बंगळुरुच्या कर्णधारपदासाठी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक 'मिस्टर 360' असलेला एबी डीव्हीलियर्सचं नाव आघाडीवर आहे. एबी अगदी काही चेंडूच सामन्याचा चेहरामोहरा बदलतो. एबीने अनेकदा पराभव होणाऱ्या सामन्यात संघाला फटकेबाजीच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे विराटनंतर एबीला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. एबीने 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेला आपल्या नेतृत्वात सेमी फायनलपर्यंत पोहचवलं होतं. एबीला कर्णधार म्हणून मोजका अनुभव असला तरी तो पुरेसा आहे.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
एबीनंतर ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचंही कर्णधार म्हणून नाव चर्चेत आहे. ग्लेनला कर्णधार म्हणून अनुभव आहे. ग्लेन बंगळुरुत येण्याआधी तो पंजाबची कॅप्टन्सी करत होता. यासह ग्लेनला बीग बॅश लीगमध्येही कॅप्ट्न्सीचा अनुभव आहे. ग्लेनने आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 12 सामन्यांमध्ये 145.35 च्या स्ट्राईक रेटने 407 धावा कुटल्या आहेत.
देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal)
देवदत्त पडीक्कल या युवा खेळाडूने आयपीएलच्या 13 व्या मोसमातून पदार्पण केलं. देवदत्तने पदार्पणातील मोसमातच अनकॅप्ड खेळाडू म्हणून अनेक विक्रम केले. त्यानंतर झालेल्या विजय हजारे करंडकाडतही देवदत्तनेही खोऱ्याने धावा केल्या. देवदत्त सुरु असलेल्या आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 11 मॅचेसमध्ये 135.39 च्या स्ट्राईक रेटने 349 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता या तिघांपैकी कोणा एकाला कॅप्टन्सी मिळणार की या स्पर्धेत आणखी कोणी येणार, हे पाहणं औतसुक्याचं ठरणार आहे.