BCCI : `केएल राहुलला संधी आणि प्रत्येकवेळी वेगळी टीम`; या कारणांमुळे चेतन शर्मांची हकालपट्टी
Team India : बीसीसीआयने अचानक मोठा निर्णय घेत सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवडकर्त्यांना अनेक कठीण प्रश्न विचारले.
Team India : टी-20 वर्ल्ड कप सारख्या (T20 World Cup 2022) मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआय (BCCI) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. शुक्रवारी बीसीसीआयने अखेर शुक्रवारी कठोर निर्णय घेत चेतन शर्मा यांच्या (Chetan sharma) अध्यक्षतेखालील चार सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीची हकालपट्टी केली. बीसीसीआयने 28 नोव्हेंबरपर्यंत निवडकर्ता या पदासाठी नवीन अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने निवडकर्त्यांना संघाबाबत प्रश्न विचारत संपूर्ण निवड समिती हटवली.
भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी
चेतन शर्मा यांच्या कार्यकाळात भारतीय संघ 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. याशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही संघ साखळी फेरीतून बाहेर पडला. वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. या स्पर्धेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
खराब फॉर्म नंतरही केएल राहुल संघात
या स्पर्धांमध्ये सलामीवीर केएल राहुल फ्लॉप ठरला. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला केएल कडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती तेव्हा तो लवकर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतायचा. मोठ्या सामन्यांमध्ये नेहमीच तो अयशस्वी ठरला. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील 6 सामन्यात त्याने 128 धावा केल्या आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने फक्त 5 धावा निघाल्या. मात्र खराब कामगिरीनंतरही सातत्याने त्याला संघात स्थान देण्यात आले.
कर्णधारपदी सातत्याने बदल
2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले. यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाचे कर्णधारपद स्विकारले. पण निवडकर्त्यांनी त्याला महत्त्वाच्या दौऱ्यांवर विश्रांती दिली आणि त्याच्या जागी दुसरा कर्णधार नेमला. दक्षिण आफ्रिका मालिकेत ऋषभ पंत, नेदरलँडविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्या आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर केएल राहुलला कर्णधार बनवण्यात आले. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यातही जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षभरात निवड समितीने 8 कर्णधारांना संधी दिली होती.
प्रत्येकवेळी वेगळी टीम
कोरोनानंतर भारतीय संघाने विविध देशात स्पर्धा खेळल्या मात्र प्रत्येक वेळी संघात मोठे बदल केले. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर पूर्णपणे वेगळे संघ पाठवण्यात आले होते. आवेश खान आणि रवी बिश्नोई यांना आशिया कप स्पर्धेत संधी देण्यात आली होती. मात्र टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांना वगळण्यात आले.
जायबंदी खेळाडूंना संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन झाले होते. पण तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता तरीही त्याला संघात घेण्यात आले. यानंतर दुखापतीमुळे तो संपूर्ण टी -20 विश्वचषकापासून बाहेर होता. हर्षल पटेलला संपूर्ण टी- 20 विश्वचषकात एकही संधी मिळाली नाही. त्यामुळे हर्षल पटेल पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता का? असा प्रश्नही विचारण्यात आलाय. राखीव खेळाडूंमध्ये निवड झालेल्या दीपक चहरलाही दुखापत झाली.