मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात (KKR vs CSK) खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सी सोडली. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजेतेपद जिंकून दिलं. धोनीनंतर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सर्वांच्याच मनात हा प्रश्न आहे की, धोनीने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला. तर आता यासंदर्भात चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


ईएसपीएन क्रिकइन्फोच्या म्हणण्याप्रमाणे, सीईओ काशी विश्वनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कर्णधारपद सोडण्याच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनी गेल्या काही काळापासून विचार करत होता. त्याला वाटलं की, ही योग्य वेळ आहे जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याची. 


काशी विश्वनाथ पुढे म्हणाले की, जडेजा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात उत्तम टप्प्यातून जातोय. सीएसकेचा कर्णधार म्हणून त्याच्यासाठी ही योग्य वेळ आहे.  जेव्हा टीम प्रॅक्टिस करण्यासाठी जात होती त्याचवेळी धोनीने कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितलं होतं.


कर्णधारपदाच्या नावासाठी जडेजाच्या नावावर यापूर्वीही चर्चा करण्यात आली होती. गेल्या वर्षी देखील यासंदर्भातील प्रस्ताव आला होता. दरम्यान धोनीचा हा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक असू शकतो, असंही काशी विश्वनाथ म्हणालेत.


आता चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा रवींद्र जडेजाच्या हातात आहे. विश्वनाथ म्हणाले की, फ्रेंचायझीचा कर्णधार म्हणून जडेजावर भरपूर विश्वास आहे. तसंच महेंद्रसिंग धोनीचे मार्गदर्शन त्याला नेहमी मिळत राहील. एकूणच त्यांच्यासाठी ही चांगली शिकण्याची संधी असेल.