Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भडकवल्यावर गप्प बसत नाही. मग ते खेळाचे मैदान असो की अन्य कोणतीही जागा. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा गौतम गंभीर त्याच्या तिखट प्रतिक्रियेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान आणि सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. हा वाद बराच काळ सुरु होता. या भांडणात लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीरनेही उडी घेतली आणि नंतर त्याचा विराट कोहलीसोबत जोरदार वाद झाला. या घटनेनंतर आता गौतम गंभीरने त्या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील भांडणाची गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये बरीच चर्चा झाली होती. नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक युद्ध झाले होते. पण सामन्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि  विराट कोहली एकमेकांशी भिडले आणि त्यांच्यात वाद झाला. आता गंभीरने कोहली आणि नवीन यांच्यातील भांडणात उडी का घेतली हे सांगितले आहे.


गंभीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या वादावर भाष्य केले आहे. कोणीही येऊन आपल्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवू शकत नाही. सामन्यादरम्यान जे काही घडले त्यात आपण हस्तक्षेप केला नाही, पण सामना संपल्यानंतर आपल्याला आपल्या खेळाडूंचा बचाव करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, असे गौतम गंभीरने म्हटलं आहे.


'एक मार्गदर्शक म्हणून माझे काम माझ्या खेळाडूंची काळजी घेणे आहे. माझ्या खेळाडूंना कोणीही येऊन चिडवू शकत नाही. मार्गदर्शक म्हणून कोणीही येऊन माझ्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवू शकत नाही. माझी धारणा अगदी वेगळी आहे. जोपर्यंत सामना सुरू होता तोपर्यंत मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. एकदा सामना संपल्यानंतर, माझ्या खेळाडूंशी कोणी जोरदार वाद घातला तर मला त्याचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे गौतम गंभीरने म्हटलं आहे.


गौतम गंभीरने सोडली लखनऊची साथ


आयपीएल 2024 पूर्वी काही मोठे बदल झाले आहेत. याबरोबरच नवीन उल हक आणि कोहली यांच्यातील वाद देखील संपला आहे. तसेच गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्सची साथ सोडली आहे. 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात कोहली आणि नवीन यांची मैत्री झाली. तर गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये गंभीर केकेआरचा मेंटॉर म्हणून दिसणार आहे.


दरम्यान, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात एवढा जोरदार वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयपीएल 2013 दरम्यानही गंभीरचे विराटसोबत कडाक्याचे भांडण झाले आहे. दुसरीकडे नुकत्याच सुरु असलेल्या लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये गौतम गंभीर चिडलेला दिसला. लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स सामन्यात गौतम गंभीरचा भारताचा माजी गोलंदाज एस श्रीसंतसोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर खुलासा केला की, गंभीरने त्याला सामन्यादरम्यान 'फिक्सर' म्हटले होते.