...म्हणून इंग्लंडला हरवल्यावर मी आनंदित झालो नाही- नीशम
नीशमने सेलिब्रेशन न करण्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.
दुबई : क्रिकेटच्या मैदानावर असे फार कमी प्रसंग घडलेत की जेव्हा विजेत्या संघाच्या कोणत्याही खेळाडूने आनंद व्यक्त केला नसेल. बुधवारी असंच चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर होतं. जेव्हा इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना किवींनी जिंकला. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या विजयानंतर अष्टपैलू जिमी नीशमने आनंद साजरा केला नाही.
नीशमने 11 चेंडूत 27 रन्सची तुफानी खेळी करत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विजय मिळवल्यानंतर नीशमचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये तो एका कोपऱ्यात शांत बसलेला दिसत होता.
तर आता नीशमने सेलिब्रेशन न करण्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतरच तो आपल्या भावना उघडपणे व्यक्त करेल, असा विश्वास नीशमला आहे.
नीशमने 'न्यूझीलंड क्रिकेट'ला सांगितलं, 'तो आनंद साजरा करण्याचा एक प्रसंग होता, परंतु तुम्ही केवळ उपांत्य फेरी जिंकण्यासाठी अर्ध्या जगाचा प्रवास करत नाही. अंतिम सामन्याकडे आमचं लक्ष लागलं आहे. मला खात्री आहे की जर आम्ही अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी झालो तर आम्ही आमच्या भावना अधिक मोकळेपणाने व्यक्त करू शकू."
सामना संपल्यानंतर एकटात बसला होता नीशम
इंग्लंडला नमवत न्यूझीलंडच्या टीमने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली. नीशमच्या झंझावाती सामन्यातील टर्निंग इनिंगच्या जोरावर टीमने हा ऐतिहासिक क्षण गाठला.
दुखापती आणि खराब फॉर्ममुळे एकेकाळी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलेल्या नीशमने संघाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयानंतर तो मैदानाजवळ एकटाच बसलेला दिसला. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले पण नीशम मैदानाजवळ एकटाच राहिलेला दिसला.