Tree Emojis In Gujarat Titans vs Chennai Super Kings Match: इंडियन प्रमिअर लिगच्या (IPL 2023) यंदाच्या पर्वामध्ये प्लेऑफ्सच्या सामन्यांमध्ये एक विचित्र गोष्ट पहायला मिळाली. प्लेऑफ्सचा पहिला सामना 23 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सदरम्यान (CSK vs GT) खेळवण्यात आला. हा सामना चेन्नईने 15 धावांनी जिंकला. मात्र या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपणादरम्यान स्क्रीनवर चक्क झाडांचे इमोजी दिसत होते. अनेकांना हे असं का दाखवलं जात आहे हे कळलं नाही. मात्र टीव्हीच्या तळाशी दिसणाऱ्या पट्टीवरील या झाडांच्या इमोजीमागे एक खास कारण आहे. 


सामन्यात काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणेफेक जिंकून गुजरातच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 20 षटकांमध्ये 172 धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनव्हे यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिल्याचा फायदा झाला. रविंद्र जडेजा, अंबती रायडू आणि अजिंक्य रहाणेने दुहेरी धावसंख्या गाठत संघाच्या स्कोअरमध्ये हातभार लावला. 173 धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला केवळ 157 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून शुभमन गिल आणि राशिद खान हे दोघे वगळता कोणत्याही फलंदाने फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळेच निर्धारित 20 षटकांमध्ये गुजरातला केवळ 157 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातच्या संघाने तब्बल 48 निर्धाव चेंडू खेळल्याचा त्यांना फटका बसला.


झाडं का दाखवण्यात आली?


गुजरात विरुद्ध चेन्नईच्या सामन्यामध्ये स्कोअरकार्डमध्ये ही झाडं दाखवण्यामागील कारण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआयने) घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय. बीसीसीआयने प्लेऑफ्समधील सामन्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलसाठी म्हणजेच निर्धाव चेंडूसाठी 500 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. म्हणजेच जेव्हा जेव्हा या सामन्यांमध्ये निर्धाव चेंडू टाकला जाईल तितके चेंडू गुणिले 500 झाडं बीसीसीआय लावणार आहे. यासाठी टीव्हीवरील स्कोअरबोर्डमध्ये ओव्हर दाखवता डॉट चेंडूला शुन्याऐवजी झाडांचा इमोजी दाखवण्यात आला. 


किती डॉट बॉल टाकले


मंगळवारी झालेल्या गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यामध्ये गुजरातच्या संघाने 34 डॉट बॉल टाकले. तर चेन्नईच्या गोलंदाजांनी 48 डॉट बॉल टाकले. प्रत्येक चेंडूसाठी 500 झाडं या हिशोबाने 82 डॉट बॉलसाठी बीसीसीआयकडून आता 41 हजार झाडं लावली जाणार आहेत. 



मुनगंटीवार यांच्याकडूनही कौतुक...


बीसीसीआयच्या या नव्या धोरणाचं कौतुक राज्याचे वनमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. "भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने प्लेऑफ सामन्यांमध्ये खेळल्या जाणार्‍या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावणार असल्याचे गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई सुपर किंग या सामन्यादरम्यान समालोचकांद्वारे जाहीर केले. BCCI ने घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. निसर्गसंपदेचे महत्व लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार," असं मुनगंटीवार म्हणाले.



आरसीबीचं धोरण


पर्यावरण संवर्धानसंदर्भातील बीसीसीआयच्या धोरणानुसार वृक्षारोपणाचा हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यापूर्वी 2011 मध्ये ग्रीन गेम धोरण स्वीकारलं होतं. प्रत्येक पर्वातील एक सामना बंगळुरुचा संघ हिरव्या रंगाच्या स्पेशल जर्सीमध्ये खेलतो. पर्यावरणासंदर्भातील जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आरसीबीने हे धोरण स्वीकारलं आहे.