BCCI neglecting blind cricket : 1983... कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं वन डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला... 2007... कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं भारताला पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला... आणि 2011... धोनीच्याच टीम इंडियानं भारतानं दुस-यांदा वन डे वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम गाजवला... मात्र तुम्हाला हे माहित आहे का भारताच्या ब्लाईंड क्रिकेट टीमनं आतापर्यंत कितीवेळा वर्ल्ड कप जिंकलाय? आमची खात्री आहे की, तुमच्यापैकी कुणालाच ही माहिती नसणार... पुढचा वर्ल्ड कप कधी होणार? आयपीएलचा नवा हंगाम कधी सुरू होणार? हे सगळ्यांनाच माहित असतं. मात्र आतापर्यंत तब्बल पाचवेळा वर्ल्ड कप जिंकून देणा-या भारतीय ब्लाईंड क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण? हे आपल्यापैकी कुणालाच माहित नाही. ज्या देशात क्रिकेट धर्म आणि क्रिकेटपटू हे देव मानले जातात, त्याच देशात ब्लाईंड टीमचे कॅप्टन दुर्गा राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय... जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. क्रिकेटवर BCCI पाण्यासारखा पैसा खर्च करते. भारतीय क्रिकेटपटूंना करोडो रुपयांची पॅकेजेस दिली जातात... अगदी आयपीएलमध्ये दरवर्षी विदेशी क्रिकेटपटूंवर देखील करोडो रुपयांची दौलतजादा करणारं BCCI... मात्र ब्लाईंड क्रिकेटला आर्थिक मदत देताना मात्र त्यांचा हात का आखडतो, हे मोठं कोडंच आहे. ब्लाईंड क्रिकेटर आणि सामान्य क्रिकेटपटू यांच्यात गुणवत्तेच्या बाबतीत काहीच फरक नाही. ब्लाईंड क्रिकेटपटूही वर्षवर मेहनत घेतात, मैदानात घाम गाळतात, देशाचं प्रतिनिधीत्व करता.. बदल्यात त्यांना काय मिळतं?


टीम इंडियातल्या क्रिकेटपटूंना श्रेणीनुसार मानधनाचं वार्षिक पॅकेज दिलं जातं. याउलट ब्लाईंड क्रिकेटपटूंचं मानधन निश्चित नाही.भारतीय क्रिकेटपटू एका वनडे मॅचमधून 6 लाख रुपयांची कमाई करतात. टी-२० मॅच खेळण्यासाठी त्यांना 3 लाख रुपये मिळतात. याउलट देशासाठी वर्ल्ड कप जिंकणा-या ब्लाईंड क्रिकेटपटूंना केवळ 3 हजार रुपये मिळतात. ब्लाईंड क्रिकेटपटूंना सरावासाठी धड मैदानही नाही. पाकिस्तानमध्येही ब्लाईंड क्रिकेट टीमला मान्यता आहे. मात्र भारतीय ब्लाईंड टीमला BCCIकडून अजून मान्यता मिळालेली नाही.


ब्लाईंड क्रिकेटचे नियम 


ब्लाईँड क्रिकेट टीममध्येही 11 खेळाडू असतात. त्यापैकी 4 क्रिकेटपटू पूर्णपणे अंध असतात. 4 क्रिकेटपटू अंशतः अंध असतात म्हणजे 2 ते 4 मीटरपर्यंतचं त्यांना दिसतं. तर 3 क्रिकेटपटू दृष्टीबाधित असतात म्हणजे 4 ते 6 मीटरपर्यंतचं त्यांना दिसतं. ब्लाईंड क्रिकेटमधला बॉल आकारानं मोठा असतो. त्यातल्या बॉल बियरींगमुळं घुंगरासारखा आवाज येतो. अंडरआर्म बॉलिंग केली जाते. फलंदाजानं रेडी असं म्हटल्यानंतरच बॉल टाकला जातो. बॉल टाकल्यानंतर बॉलरला प्ले असं ओरडावं लागतं. पूर्ण अंध असलेल्या क्रिकेटपटूनं फोर मारला तर 8 रन्स आणि सिक्स मारला तर 12 रन्स मिळतात. अंध क्रिकेटपटूनं एक टप्पा कॅच पकडला तरी फलंदाज बाद होतो.



आज महिला क्रिकेट टीमला BCCI नं मान्यता दिल्यानंतर महिला क्रिकेटही लोकप्रिय ठरतंय. त्याच प्रमाणं ब्लाईंड क्रिकेटवर BCCIनं कृपादृष्टी दाखवली तर त्याकडं पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोनही बदलल्याशिवाय राहणार नाही.