#MSDhoni: माहीच्या निवृत्तीवर पत्नी साक्षीची प्रतिक्रिया
काय म्हणाली साक्षी...
मुंबई : भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक करून देशाचं नाव यशाच्या उच्च शिखरावर नेणाऱ्या धोनीने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत अनेकदा देशाचं नाव मोठं केलं. इन्स्टाग्रामवर धोनीने एक व्हिडिओ पोस्ट करून आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. 'मे पल दो पल का शायर हूं' असं म्हणत त्याने त्याचा क्रिकेटचा प्रवास थांबवला आहे.
एवढे वर्ष दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आपण सगळ्यांचे धन्यवाद देतो, असं म्हणत त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी साक्षीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
साक्षीने इन्स्टाग्रामवर लिहलेय की, ‘ जे काही मिळवलं आहे त्याचा तुम्हाला गर्व असला पाहिजे. क्रिकेटमध्ये आपलं बेस्ट दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल आणि तुमच्याबद्दल मला गर्व आहे. जीव की प्राण असणाऱ्या क्रिकेटला रामराम करताना तुम्ही डोळ्यातून आश्रूंना थांबवलं असेल. भविष्यातील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. #thankyoumsd #proud’ अशी प्रतिक्रिया साक्षीने दिली.
धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप, २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीच्याच नेतृत्वात भारत पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.