मुंबई : टीम इंडियाचा पुढचा दौरा दक्षिण आफ्रिकेचा आहे. पुढील काही दिवसांमध्ये इंडिया टीम या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. तर आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद हिरावून घेतलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतासाठी 100 हून अधिक कसोटी खेळणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संघातून बाहेर ठेवलं जाऊ शकतं.


वनडे मालिकेसाठी संघाची निवड नंतर होणार


मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट बोर्ड कसोटी मालिकेसाठीच टीम इंडियाची घोषणा करणार आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड नंतर केली जाणार आहे. कारण पुढील वर्षी 19 जानेवारीपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. यासोबतच वनडे कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या भवितव्याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे.


सलग मिळणाऱ्या अपयशानंतर उपकर्णधारपदी राहणं अजिंक्य रहाणेसाठी खूप अवघड आहे. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत फिटनेसचं कारण देत त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. रहाणेला उपकर्णधारपदावरून हटवल्यास ही जबाबदारी टी-20 कर्णधार रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते.


या खेळाडूंना मिळणार संधी


त्याचप्रमाणे 100 हून अधिक कसोटी खेळलेल्या इशांत शर्मालाही संघात स्थान मिळणं कठीण आहे. इशांत बराच काळ फॉर्ममध्ये नाहीये. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादवसह प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खानला यंदा संधी मिळू शकते. श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि हनुमा विहारी मधल्या फळीत खेळतील.