वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तानशी खेळणार नाही? इतिहासातल्या बहिष्काराच्या घटना
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची भावना आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच पुलवामाच्या हल्ल्यामुळे दोन्ही देशातले संबंध आणखी खराब झाले आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधली नियोजित मॅच १६ जूनला खेळवण्यात येईल.
भारत आणि पाकिस्तानमध्ये मागच्या ११ वर्षांमध्ये द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. पण हे दोन्ही देश आयसीसी किंवी एसीसी (आशिया क्रिकेट काऊन्सिल) च्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. पण वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचे कोणतेही संकेत अजून बीसीसीआयनं दिलेले नाहीत. भारत सरकारनं तसे आदेश दिले तर बीसीसीआय वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळणार नाहीत. देशातली सगळ्यात जुनी क्रिकेट संघटना क्रिकेट क्लब ऑफ इंडियानं मात्र वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी केली आहे. भारतानं आत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये माघार घेतलेली नाही. क्रिकेटसह अन्य खेळांमध्येही अशाप्रकारच्या बहिष्काराच्या घटना याआधी घडल्या आहेत.
१ भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध माघार
१९७४ साली भारत डेव्हिस कप (टेनिस) फायनलमध्ये पोहोचला होता. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. डेव्हिस कपच्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होणार होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी नितीला विरोध म्हणून भारतानं दक्षिण आफ्रिकेशी संबंध तोडले होते. यामुळे भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेव्हिस कप फायनल न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतानं टेनिसमध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार जिंकण्याची संधी सोडली.
२ ६६ देशांकडून मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार
बहिष्काराच्या बाबतीत मॉस्को ऑलिम्पिक ही क्रीडा क्षेत्रातली सगळ्यात मोठी घटना होती. १९८० साली तत्कालीन सोव्हिएत संघ (रशिया) मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ६६ देशांनी बहिष्कार घातला होता. ज्यावेळी मॉस्को ऑलिम्पिकला सुरुवात झाली होती, तेव्हा सोव्हिएत संघाचं लष्कर अफगाणिस्तानमध्ये होतं. रशियन लष्कर अफगाणिस्तानच्या सरकारविरुद्ध दहशतवाद्यांची मदत करत आहेत, असा आरोप अमेरिका आणि इतर देशांनी केला होता. यानंतर १९८४ साली लॉस एंजेलिस(अमेरिका) मध्ये झालेल्या ऑलिम्पिकवर सोव्हियेत रशियासह १८ देशांनी बहिष्कार घातला होता.
३ इज्रायलवर सर्वाधिक बहिष्कार
खेळाच्या मैदानामध्ये सर्वाधिक बहिष्काराचा सामना हा इज्रायलला करावा लागला आहे. अरब देशांनी अनेक वेळा इज्रायलविरुद्ध खेळायला नकार दिला होता. २०१६ साली झालेली ऑलिम्पिक स्पर्धा हे ताजं उदाहरण आहे. ब्राझिलमध्ये झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये ज्युडोच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सौदी अरबच्या जाऊट फाहमीचा सामना क्रिस्टीनासोबत होणार होता. पण फाहमीनं या सामन्याच्या आधीच आपण सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याचं आयोजकांना सांगितलं, यामुळे हा सामना होऊ शकला नाही.
४ श्रीलंकेचा बहिष्कार रोखण्यासाठी भारत-पाकिस्तान एकत्र
१९९६ मध्ये भारत-पाकिस्तान-श्रीलंकेमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या काळात श्रीलंकेमध्ये एलटीटीई ही दहशतवादी संघटना कार्यरत होती. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजनं सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेमध्ये क्रिकेट खेळायला नकार दिला. यामुळे आणखी काही देश श्रीलंकेत क्रिकेट खेळणार नाहीत, अशी शंका निर्माण झाली. अखेर श्रीलंकेच्या मदतीला भारत आणि पाकिस्तान धावले. या दोन्ही देशांनी त्यांची संयुक्त टीम बनवून श्रीलंकेला पाठवली. भारत-पाकिस्तानच्या या टीमचा कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन होता. ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजची टीम यानंतरही श्रीलंकेत गेल्या नाहीत. ग्रुपमधल्या बाकी टीमनी मात्र श्रीलंकेत जाऊन मॅच खेळल्या.
५ न्यूझीलंड-इंग्लंडचा बहिष्कार
२००३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं सुरक्षेच्या कारणास्तव केनियाला जायला नकार दिला. तर इंग्लंडनं झिम्बाब्वेविरुद्ध त्यांच्या देशातल्या राजकीय परिस्थितीमुळे तिकडे सामना खेळला नाही. या कारणामुळे केनिया आणि झिम्बाब्वेला मॅच जिंकल्याचे पॉईंट देण्यात आले. हे पॉइंट मिळाल्यामुळे केनिया आणि झिम्बाब्वेला सुपर सिक्समध्ये जाता आलं. केनियाची टीमतर या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही पोहोचली. तर इंग्लंडचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपलं.
६ उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाची संयुक्त टीम
एक वर्षापूर्वी दक्षिण कोरियामध्ये शीतकालीन ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. नेहमीप्रमाणेच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव होता. अमेरिका या तणावामध्ये दक्षिण कोरियाची मदत करत होता. यामुळे नाराज झालेल्या उत्तर कोरियानं अमेरिकी बेटावर बॉम्ब हल्ले केले. शीतकालीन ऑलिम्पिक यशस्वी होणार नाही असं वाटत होतं, पण दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियानं खेळामध्ये तणाव आणला नाही. तर दोन्ही टीमनी खेळाचा वापर तणाव कमी करण्यासाठी केला. या दोन्ही देशांनी शीतकालीन ऑलिम्पिकमध्ये आईस हॉकीच्या संयुक्त टीम उतरवल्या. यानंतर एशियन गेम्समध्येही दोघांनी जॉईंट मार्चपोस्ट केलं. आता २०३२ साली दोन्ही देश ऑलिम्पिकचं संयुक्त आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहेत.