रोहित नव्हे तर ओपनिंगसाठी टीम इंडियाला मिळाला नवा मराठमोळा हिटमॅन!
रोहितच्या जागी कोण खेळाडू असेल जो संघात सलामीची धुरा सांभाळेल, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहणार आहे.
मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा सध्या जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज आहे. रोहित एकटाच स्वबळावर संपूर्ण सामन्याचा चेहरामोहरा बदलू शकतो यात शंका नाही. पण आता हळूहळू रोहितचे वय वाढत असून येत्या काही वर्षांत तो क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो. अशा परिस्थितीत रोहितच्या जागी कोण खेळाडू असेल जो संघात सलामीची धुरा सांभाळेल, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आयपीएलमुळे मिळालं आहे.
हा फलंदाज सांभाळणार सलामीची जबाबदारी
रोहित शर्मा सध्या 34 वर्षांचा आहे आणि यानंतर काही वर्षात बहुतांश खेळाडू क्रिकेटला अलविदा करतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाला रोहितच्या जागी नवीन ओपनरची गरज भासेल. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड ही जबाबदारी सांभाळू शकतो.
ऋतुराज गायकवाड अवघ्या 24 वर्षांचा फलंदाज टीम इंडियाचं भविष्य आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याच्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत.
श्रीलंकेविरुद्ध केलं डेब्यू
ऋतुराज गायकवाडने यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यादरम्यान त्याला 2 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये तो केवळ 35 धावा करू शकला. पण सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याचा खेळ चांगला सुरु आहे.
आयपीएल 2021 मध्ये या खेळाडूचा जो फॉर्म होता, तोच फॉर्म आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही पाहायला मिळतो. त्यामुळे ऋतुराजच्या आगमनानंतर रोहित शर्मासारखा सलामीवीर कोठून येईल, याचा ताण नक्कीच कमी होईल.
गायकवाड रोहितसारखा दमदार खेळाडू
ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडेही रोहित शर्माइतकीच ताकद आहे. रोहितप्रमाणेच तोही महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. रोहितबद्दल बोलायचे झाले तर तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आहेत. त्याचबरोबर या फलंदाजाला नुकतेच भारताच्या T20 संघाचे कर्णधार बनवण्यात आलं आहे.