IPL ला मध्येच सोडून गेल्यास खेळाडूवर लागणार बंदी?
विनाकारण आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना लगाम घालण्याची तयारी बीसीसीआय करतंय.
मुंबई : आयपीएलचा डंका अखेर वाजलाय. 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात झाली असून सिझन सुरु होण्यापू्र्वीच काही खेळाडूंनी माघार घेतली आहे. तर काही खेळाडू अनेकदा काही कारणास्तव मध्येच आयपीएल सोडून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र आता असा निर्णय घेणं खेळाडूंना महागात पडणार आहे. विनाकारण आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना लगाम घालण्याची तयारी बीसीसीआय करतंय.
BCCI घेणार मोठा निर्णय
आयपीएलमधून कोणत्याही कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालण्यासाठी बीसीसीआय नवा नियम आणण्याच्या विचार करतंय. लिलावात मोठी किंमत मिळाल्यानंतर स्पर्धेतून माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढताना दिसतेय. अशा स्थितीत बीसीसीआय धोरण आणण्याच्या तयारीत आहे.
या धोरणामुळे खेळाडू योग्य कारणाशिवाय आयपीएलमधून बाहेर पडू शकणार आहे. गव्हर्निंग काऊंसिलच्या (GC) नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत, खेळाडूंचा स्पर्धेतून माघार घेण्याचा ट्रेंड थांबवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी एखाद्या खेळाडूने क्षुल्लक कारणास्तव माघार घेतल्यानंतर टीमच्या फ्रेंचायझींचे पुढचे प्लॅन बिघडतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आता किरकोळ कारणामुळे बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना वॉच लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
जेसन रॉयने घेतली माघार
आयपीएल सुरु होण्यापूर्वी गुजरात टायटन्सच्या टीमला मोठा धक्का बसला होता. गुजरातचा खेळाडू जेसन रॉयने बायो बबलचं कारण देत आयपीएलमधून माघार घेतली होती. दरम्यान रॉयचं हे वर्तन पाहता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर अडीच हजार पाऊंडचा दंड लावला होता.
सहसा दुखापतग्रस्त खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आयपीएलमधून माघार घेण्याता दिसतात. मात्र अलीकडे खेळाडू इतर कारणांमुळेही स्पर्धेतून बाहेर घेताना दिसतात.