मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा क्रिकेटचे सामने होतात, तेव्हा जल्लोष शिगेला असतो आणि इतिहास नक्कीच घडतो. जसं यावेळी टी-20 वर्ल्ड्कपमध्ये घडलं. पाकिस्तानने पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये 12 सामन्यांनंतर भारताचा पराभव केला. फक्त भारत पाकिस्तान फॅन्सने नाही तर तमाम क्रिकेट फॅन्सने हा सामना पाहिला. तरीही 2012-13 नंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका कधी होणार? हा असा प्रश्न सर्वांसमोर आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहतेही सामन्यांची वाट पाहत आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या मालिकेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने दिलेली नवी माहिती फारशी आशादायक नाही.


आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी ज्योफ अलर्डिस यांनी भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत मोठी माहिती दिली आहे. दुबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे स्वरूप, अफगाणिस्तान क्रिकेट आणि भारत-पाकिस्तान मालिकेबाबत मत व्यक्त केलंय.


भारत-पाकिस्तान मालिकेत आयसीसी कोणतीही भूमिका बजावणार नाही


भविष्यात भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यात आयसीसी काही भूमिका बजावेल का, असा प्रश्न अलर्डिस यांना विचारण्यात आला. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, "द्विपक्षीय मालिकेत आमची भूमिका असणार नाही. जेव्हा दोन्ही देशांचे संघ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतात तेव्हा नक्कीच आम्हाला आनंद होतो. परंतु दोन्ही देश आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील सध्याचे संबंध असे आहेत, ज्यावर आयसीसी कोणत्याही परिस्थितीत प्रभाव टाकू शकत नाही."


गेल्या 8 वर्षात भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटशी संबंधित संबंध पूर्णपणे संपुष्टात आले. आयसीसी टूर्नामेंटमध्येच दोन्ही संघ एकमेकांशी भिडताना दिसले आहेत. 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी शेवटची कसोटी मालिका खेळली होती.