तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली या तीन खेळाडूंना संधी देणार?
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. या पराभवामुळे भारत ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं पिछाडीवर पडला आहे. आता सीरिजमधलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर भारताला पुढची टेस्ट मॅच जिंकणं आवश्यक आहे. १८ ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहलीनं भारतीय टीममध्ये बदल करावे अशी मागणी होत आहे. भारतीय टीममध्ये करुण नायर, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांना संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननी इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगसमोर लोटांगण घातलं. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम १०७ रनवर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाली. तर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली वगळता सगळ्या बॅट्समननी निराशा केली. पहिल्या मॅचमध्ये विराट कोहलीनं १४९ आणि ५१ रनची खेळी केली होती.
भारतीय बॅट्समन वारंवार अपयशी होत असल्यामुळे तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कुलदीप यादवऐवजी रवींद्र जडेजाला टीममध्ये घ्यावं तर दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला संधी द्यायचा विचार विराट कोहली करू शकतो. रवींद्र जडेजाला टीममध्ये संधी मिळाली तर भारतीय बॅटिंग आणखी मजबूत होऊ शकते. आत्तापर्यंतच्या ४ इनिंगमध्ये दिनेश कार्तिकनं ०, २०, १ आणि ० अशा एकूण २१ रन केल्या आहेत.
करुण नायरला संधी द्यायची असेल तर त्याला फक्त ओपनिंगची जागाच शिल्लक आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शिखर धवन आणि मुरली विजयबरोबर भारतीय टीम मैदानात उतरली होती. तर लोकेश राहुल तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. पण दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये शिखर धवनला डच्चू देण्यात आला आणि पुजाराला संधी देण्यात आली. पहिल्या दोन्ही टेस्ट मध्ये लोकेश राहुल आणि मुरली विजयनं निराशा केली. मुरली विजय तर दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला. त्यामुळे मुरली विजय किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला वगळून करुण नायरला ओपनिंगला पाठवण्याचा धाडसी निर्णय कोहली घेईल का हा प्रश्न आहे.