मुंबई : विम्बल्डन या मानाच्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत शनिवारी महिला एकेरी गटातील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात रोमानियाच्या सिमोना हॅलेप हिने अमेरिकेच्या सेरेना विलियम्स हिच्यावर मात केली. सरळ सेटमध्ये सेरेनाला पराभूत करत सिमोनाने शनिवारी विम्बल्डनमध्ये इतिहास रचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्य़ात २७ वर्षीय आणि जागतिक टेनिस क्रमावारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या सिमोनाने  सामन्याच पहिल्या मिनिटापासून सेरेनाला चिवट झुंज दिल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या ५६ मिनिटांच्याच खेळामध्ये तिने सेरेनाला ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभवाचा झटका दिला. 




सेरेनाला नमवल्यानंतर सिमोनाला भावना अनावर झाल्या. जेतेपदाचं चषक स्वीकारतेवेळीसुद्धा तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया यावेळी सिमोनाने दिली. विजयानंतर प्रतिक्रिया देत शब्दांवाटे तिने भावना व्यक्त केल्या. 'हे माझ्या आईचं स्वप्नं होत. टेनिसमध्ये मी काही उल्लेखनीय कामगिरी करावी असं वाटत असेल तर विम्बल्डमध्ये एक दिवस खेळावं असंत तिचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अखेर साकार झालं आहे.तो दिवस आज आला आहे', अशी प्रतिक्रिया तिने दिली. आतापर्यंतच्या कारकिर्दीत हा सर्वात उत्तम सामना होता, असंही ती म्हणाली. 




पुरुष एकेरीत रॉजर फेडररची लढत नोवाक जोकोविचशी 


टेनिस आणि विशेष म्हणजे विम्बल्डनवर राज्य करणारा रॉजर फेडरर आणि सध्याच्या घडीला टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या नोवाक जोकोविच यांच्यामध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. 


दोन तुल्यबळ खेळाडूंमध्ये होणारी सेंटर कोर्टवरील लढत पाहणं टेनिस प्रेमींसाठी परवणी ठरणार आहे. रॉजर फेडररने आतापर्यंत एकूण २० ग्रँडस्लॅम सिंगल्सचे जेतेपद पटकावले आहे. तर, नोवाक जोकोविचने आतापर्यंत १५ ग्रँडस्लॅमचं जेतेपद मिळवलं आहे.  त्यामुळे या दोन्ही खेळाडूंपैकी कोणाच्या नावे यंदाच्या विम्बल्डनचं जेतेपद जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.