हरिश मालुसरे, झी मीडिया : भारताची 'लेडी सेहवाग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्माने (Shafali Verma) कोणालाही न जमलेला विक्रम आपल्या नावावर केला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात शेफालीने धमाकेदार कामगिरी केली. या सामन्यामध्ये केलेल्या खेळीच्या जोरावर शेफालीने टी-20 मध्ये सर्वात कमी वयात 1000 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Shafali Verma creates new world record 1000 Runs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेफालीने T-20 क्रिकेटमध्ये 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. अवघ्या 18 व्या वर्षीच शेफालीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शेफालीने 1000 धावा करण्यासाठी एकूण 765 चेंडूंचा सामना केला. पदार्पणापासून 3 वर्षे, 14 दिवसात तिने ही कामगिरी केली आहे. याआधी हा विक्रम जेमिमाह रॉड्रिक्सच्या नावावर होता, तिने 21 वर्षे 32 दिवसांमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला होता.  


बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या शेफाली वर्माने आक्रमक पवित्रा घेतला होता. 44 चेंडूंमध्ये 55 धावांची खेळी केली. यामध्ये तिने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. आजच्या सामन्यामध्ये तिने गोलंदाजीही केली यामध्ये तिने दोन बळी घेतले. यातील बांगलादेशची कर्णधार निगर सुलतानाला 36 धावांवर बाद केलं.  


भारताने हा सामना बांगलादेशविरूद्धचा सामना 59 धावांनी जिंकला आहे. तर या विजयासह महिला भारतीय संघाने पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेत आपलं स्थान आणखी बळकट केलं आहे.