टी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोअर, १० खेळाडू शून्यवर आऊट
क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड होत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.
सिडनी : क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड होत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात. ऑस्ट्रेलियातल्या स्थानिक क्रिकेटमध्ये एका लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियातल्या महिलांच्या स्थानिक टी-२० स्पर्धेत सगळ्यात कमी स्कोअरची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियातल्या इंडिजिनियस क्रिकेट चॅम्पियनशीपमध्ये महिला टीम फक्त १० रनवर ऑल आऊट झाली. या मॅचमध्ये सर्वाधिक रन या अतिरिक्त होत्या.
एलिस स्प्रिंग्समध्ये सुरु असलेल्या चॅम्पियनशीपदरम्यान न्यू साऊथवेल्सविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम १० रनवर ऑल आऊट झाली. यातल्या ६ रन या वाईडमुळे आल्या.
दक्षिण ऑस्ट्रेलियाची ओपनिंग बॅट्समन फेबी मेनसेलनं ४ रन केले, तर उरलेल्या १० बॅट्समनना त्यांचं खातंही उघडता आलं नाही. रोक्सने वान वीननं २ ओव्हरमध्ये १ रन देऊन ४ विकेट घेतल्या. नाओमीनं २ बॉलमध्ये २ विकेट घेतल्या. ही संपूर्ण इनिंग फक्त ६२ बॉल चालली. न्यू साऊथवेल्सनं १५ बॉलमध्येच हे आव्हान पूर्ण केलं. ११ रनचा पाठलाग करताना न्यू साऊथवेल्सनंही २ विकेट गमावल्या.
फेबी मेनसेल आणि वानिकी गिबुमा या दोन खेळाडूंनी ३ पेक्षा जास्त बॉल खेळले. अशाप्रकारचा स्कोअरबोर्ड क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. विशेष म्हणजे एका महिन्यातच हे रेकॉर्ड तुटलं आहे. मागच्या महिन्यात १३ तारखेला बँकॉकमध्ये झालेल्या टी-२० मॅचमध्ये चीन महिला टीमनं युएई महिला टीमविरुद्ध फक्त १४ रनचा स्कोअर केला होता. टी-२० इतिहासातला तेव्हाचा तो सगळ्यात कमी स्कोअर होता. यानंतर एकाच महिन्यात हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियातल्या महिला टीमनं तोडला.