उलान-उदे (रशिया) : भारताची बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम (५१ किलो) हिला शनिवारी जागतिक महिला  बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मेरी कोमचे सातव्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरण्याचे स्वप्न भंगले. द्वितीय मानांकित टर्क बुसेनाझ कॅगिरोगलू हिने अटीतटीच्या लढतीत मेरीचा ४-१ असा पराभव केला. त्यामुळे आता मेरी कोमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे. मात्र, भारताने या लढतीमधील पंचाच्या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या इंग्रीत व्हॅलेन्सिया हिला ५-० असे चीतपट केले होते. त्यामुळे मेरी कोम पुन्हा एकदा जगज्तेतेपदावर नाव कोरणार का, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते. 


यापूर्वी मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात सहा सुवर्णपदके आणि सहा रौप्यपदके जिंकली आहेत. मात्र, मेरी कोम यंदा पहिल्यांदाच ५१ किलो वजनी गटातून खेळत होती. 


दरम्यान, आता भारताला लवलीना बोरगोहेन (६९ किलो), जमुना बोरो (५४ किलो), मंजू रानी (४८ किलो) यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. या तिघीजणी थोडयाचवेळात उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहेत.