मुंबई : महिला क्रिकेटर्सचा 'मिनी आयपीएल' म्हणजेच चॅलेन्जर सीरिज 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे यंदा आयपीएल भारताबाहेर होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील पुरुषांच्या आयपीएलनंतर महिलांच्या क्रिकेट स्पर्धेबद्दल देखील उत्सूकता दाखवली आहे. महिलांच्या तीन संघांची स्पर्धा ही युएईत होणार आहे.


आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'स्पर्धेची तारीख निश्चित केली गेली आहे. 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल. ट्रेलब्लेझर्स, वेलोसिटी आणि सुपरनोवाज या तीन संघांमध्ये स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 4 सामने खेळले जाणार आहेत.


'फायनल मॅचही 9 नोव्हेंबरला होणार आहे. कारण पुरुष आयपीएलच्या फायनलच्या दिवशी त्यांना महिलांच्या फायनल सामन्याचं आयोजन करायचं नव्हतं.'


माजी स्पिनर नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयने गेल्या आठवड्यात महिला क्रिकेटसाठी एक नवीन निवड समिती जाहीर केली असून आता ते या तीन संघांची निवड करतील.


असे मानले जाते की ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात हे संघ युएईमध्ये जातील आणि सहा दिवस क्वारंटाईन काळ पूर्ण करतील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे महिला क्रिकेटर या स्पर्धेत खेळणार नाहीत. कारण महिला बिग बॅश लीग देखील त्याचवेळी होत असल्याने युएईमध्ये खेळाडूंना पोहोचणं शक्य होणार नाही.