Womens World Cup : पत्नीची फायनल बघण्यासाठी दौरा अर्धवट सोडून परतणार क्रिकेटपटू
महिला टी-२० वर्ल्ड कपची फायनल रविवारी खेळवली जाणार आहे.
मेलबर्न : महिला टी-२० वर्ल्ड कपची फायनल रविवारी खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना होणार आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून विकेट कीपिंगची जबाबदारी एलिसा हिलीकडे असणार आहे. एलिसा हिलीचा पती मिचेल स्टार्क या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहे.
ऑस्ट्रेलियाची टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वनडे मॅचची सीरिज सुरु आहे. ऑस्ट्रेलिया या सीरिजमध्ये २-०ने पिछाडीवर आहे. तरीही मिचेल स्टार्क टीमला सोडून ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. महिला टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये आपली पत्नी एलिसा हिलीला खेळताना बघण्यासाठी स्टार्कने दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
'ही संधी मिचेल स्टार्कला कदाचित आयुष्यात एकदाच मिळेल. त्यामुळे स्टार्कला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची परवानगी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. या मोसमात आम्ही स्टार्कवर कामाचं ओझं टाकलं. घरी परतल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी स्टार्क ताजातवाना होईल,' असं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले. मिचेल स्टार्कच्या गैरहजेरीत जॉस हेजलवूड, झाए रिचर्डसन किंवा केन रिचर्डसन यांच्यापैकी एकाला अंतिम-११ मध्ये संधी मिळू शकते.