साऊथम्पटन : दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सने मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण आता एबी डिव्हिलियर्सबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये एबी डिव्हिलियर्सला खेळायचं होतं. याबद्दलचा प्रस्ताव एबीने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला पाठवला होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. एबी डिव्हिलियर्सने हा प्रस्ताव दक्षिण आफ्रिकेची वर्ल्ड कपसाठीची टीम निवडण्याच्या आधी पाठवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एबी डिव्हिलियर्सचा प्रस्ताव का फेटाळण्यात आला याबाबतही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे. एबी डिव्हिलियर्सला पुन्हा टीममध्ये बोलावणं योग्य ठरणार नाही. एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर टीम एकजूट होऊन खेळत आहे. वर्ल्ड कप सुरू व्हायच्या एक वर्ष आधी म्हणजेच मे २०१८ मध्ये एबीने संन्यास घेतला. त्यामुळे तो स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करण्याच्या नियमांमध्ये बसत नाही. तसंच एबीचं वय ३५ वर्ष झालं आहे. एबीच्या अनुपस्थित जे खेळाडू चांगले खेळत आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो, अशी कारणं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिली.


दक्षिण आफ्रिका टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी एबी डिव्हिलियर्सने कर्णधार फॅफ डुप्लेसिस, प्रशिक्षक ओटिस गिबसन आणि निवड समिती प्रमुख लिंडा जोंडी यांच्यासोबत चर्चा केली होती.


एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेकडून ११४ टेस्ट, २२८ वनडे आणि ७८ टी-२० मॅच खेळल्या आहेत. डिव्हिलियर्सच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेची या वर्ल्ड कपमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे. या वर्ल्ड कपमधल्या तिन्ही मॅच दक्षिण आफ्रिकेने गमावल्या आहेत. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला उरलेल्या सगळ्या मॅच जिंकणं आवश्यक आहे.


p>