मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश या संघांमध्ये यंदाच्या विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. या विजयासह विराटसेनेने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा, खेळाडूंचा हरवलेला सूर या सामन्यात गवसल्याचं पाहायला मिळालं. परिणामी सामन्यादरम्यान अनेक लक्षवेधी प्रसंग पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळाली. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पाठिंबा देणाऱ्या अफलातून आणि प्रचंड उत्साही अशा ‘जबरा फॅन’विषयीचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘जबरा फॅन’ म्हटलं की त्यात सारंकाही आलं. हा शब्द ८७ वर्षीय आजीबाईंसाठी पूर्णपणे लागू आहे. बांगलादेशविरोधात भारताच्या खेळाडूंची कामगिरी पाहतानाच मैदानात, टेलिव्हिजनवर सामना पाहणारे रसिक आणि सोशल मीडियावरचे नेटकरी यांच्यात चर्चा रंगली ती म्हणजे चारुलता पटेल या आजीबाईंची. 



क्रिकेटचं प्रचंड वेड असणाऱ्या या आजी तरुणांनाही लाजवेल इतक्या उत्साहात भारताच्या खेळाडूंचं समर्थन करत होत्या. यावेळी त्यांच्या उत्साहाला खरंच कशाची तोड नाही, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. सामन्याच्या नंतर विराट कोहली, आणि रोहित शर्मानेही या आजींची भेट घेतली. यावेळी त्यांनी हात उंचावत खेळाडूंना आशीर्वाद दिला. यावेळी विराट आणि रोहितच्या चेहऱ्यावरील भावनाही पाहण्याजोग्या होत्या. जेव्हा खेळाडू या आजींची भेट घेण्यासाठी आल्या, तेव्हा मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी एकच कल्ला करण्यास सुरुवात केली. विराटनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन  आजींसोबतच्या भेटीचे काही फोटो पोस्ट केले.