लंडन : वर्ल्ड कपमध्ये बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पण या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिस पाकिस्तानविरुद्धची मॅच दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. भारताविरुद्धच्या मॅचवेळी मार्कस स्टॉयनिसच्या मांसपेशींना दुखापत झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये स्टॉयनिसने ७ ओव्हरमध्ये ६२ रन देऊन विराट कोहली आणि धोनीची विकेट घेतली होती. बॅटिंग करताना मात्र स्टॉयनिस शून्य रनवर आऊट झाला होता.


मार्कस स्टॉयनिस संपूर्ण वर्ल्ड कपलाही मुकू शकतो, त्यामुळे स्टॉयनिसऐवजी ऑलराऊंडर मिचेल मार्शला कव्हर म्हणून ऑस्ट्रेलियाला बोलावण्यात आलं आहे. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलिया-ए टीमकडून इंग्लंड-ए दौऱ्याला येणारच होता, पण स्टॉयनिसच्या दुखापतीमुळे त्याला लवकर बोलावण्यात आलं आहे.


शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या मॅचआधी स्टॉयनिसचा फिटनेस बघितला जाईल, यानंतर त्याच्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल. स्टॉयनिसच्या दुखापतीविषयी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच म्हणाला, 'स्टॉयनिस किती मॅच खेळणार नाही, हे अजून स्पष्ट झालं नाही. त्यामुळे मार्शला बोलावण्यात आलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये याबद्दल निर्णय होईल.'


आयसीसीच्या नियमांनुसार दुखापतग्रस्त खेळाडूला बदली खेळाडू देण्यात येतो, पण दुखापत झालेला खेळाडू पुन्हा फिट झाला तर त्याचा पुन्हा टीममध्ये समावेश करण्यात येत नाही.