World Cup 2019: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड ?
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत एकूण 147 सामने खेळले गेले आहेत.
लंडनः पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेले इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सामना होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सवर खेळण्यात येणार आहे. इंग्लंडने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या ६ मॅचपैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. इंग्लंड ८ पॉइंट्ससह अंकतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. यजमान इंग्लंडला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित ३ मॅचपैकी २ मॅच जिंकाव्या लागणार आहेत.
कोणाचं पारडं जड ?
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत एकूण 147 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 81 तर इंग्लंडने 61 सामने जिंकले आहेत. तर 2 मॅच या अनिर्णित राहिल्या, तर 3 मॅच रद्द कराव्या लागल्या. वर्ल्डकपमध्ये या दोन्ही टीममध्ये एकूण 7 मॅच खेळण्यात आल्या आहेत. यापैकी 5 मॅच ऑस्ट्रेलियाने तर 2 इंग्लंडने जिंकल्या आहेत.
इंग्लंडसमोर कडवे आव्हान
इंग्लंडसाठी 3 मॅच जिंकणे सहज शक्य नसणार आहे. कारण इंग्लंडचा यानंतरचा सामना भारता विरुद्ध होणार आहे. इंग्लंडसाठी हे आव्हानात्मक असणार आहे. इंग्लंड टीमला गेल्या २७ वर्षात वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्धात एकही मॅच जिंकता आलेली नाही. त्यामुळे या ऑस्ट्रेलियाचं पारंड जड आहे. वेगवान बॉलर जेसन रॉय याला दुखपतीमुळे बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे इंग्लंडचं टेन्शन आणखी वाढलं आहे.
ऑस्ट्रेलियाची कामगिरी
आस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने या वर्ल्डकपमध्ये ६ मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी ५ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. ऑस्ट्रेलिया पॉइंट्सटेबलमध्ये १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा हे दोन्ही सलामीवीर सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. वेगवान बॉलर मिशेल स्टार्कच्या खांद्यावर बॉलिगंची मदार आहे. त्याच्यासोबतच इतर बॉलर देखील चांगली कामगिरी करत आहे. ऑलराउंडर मार्कस स्टोनिसच्या पुनरागमनामुळे आस्ट्रेलियन टीम आणखी मजबूत झाली आहे.
ऑस्ट्रेलियाची इंग्लंड विरुद्धची सध्याची कामगिरी काही खास ठरलेली नाही. या दोन्ही टीममध्ये खेळण्यात आलेल्या मागील 10 वनडे पैकी 9 वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
आजची मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची असणार आहे. आजची मॅच जिंकून पॉइंट्सटेबलमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत करण्याचे आव्हान दोन्ही टीमसमोर असणार आहे.
टीम इंग्लंड : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), जॉस बटलर, टॉम कुरेन, लियाम डॉसन, लियाम प्लंकट, आदील राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स विंसे, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.
टीम आस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, जेसन बेहरनडार्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, नॅथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्क्स स्टोइनिस, एडम झॅंम्पा.