मुंबई : वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची निवड सोमवारी मुंबईमध्ये होणार आहे. टीम निवडीसाठी एवढा कमी कालावधी उरला असतानाही भारतीय टीमची चौथ्या क्रमांकाची समस्या अजूनही कायम आहे. चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताची चौथ्या क्रमांकाची समस्या अजूनही सुटलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५ वर्ल्ड कपनंतर भारताने युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, केएल राहुल, अंबाती रायुडू, धोनी, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मनोज तिवारी, केदार जाधव, विराट कोहली, ऋषभ पंत या १२ खेळाडूंना संधी देण्यात आली. पण यातल्या एकालाही स्वत:चं चौथ्या क्रमांकावरचं स्थान पक्कं करता आलं नाही. या कालावधीमध्ये अंबाती रायुडूनं चांगली कामगिरी केली असली तरी न्यूझीलंड दौऱ्यानंतर रायुडू खराब फॉर्ममध्ये आहे.


चौथा क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात असताना भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने नवीन खेळाडूचं नाव सुचवलं आहे. 'वर्ल्ड कपची टीम निवडण्यासाठी फक्त एक आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. माझ्यामते चेतेश्वर पुजाराची चौथ्या क्रमांकासाठी निवड झाली पाहिजे. मधल्या फळीला मजबुतीची तसंच स्विंग बॉलिंगचा सामना करणाऱ्या आणि टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूची भारताला गरज आहे,' असं ट्विट विनोद कांबळीने केलं आहे.



याआधी सौरव गांगुलीनेही पुजाराला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात यावी, असं मत व्यक्त केलं होतं. 'पुजाराच्या बॅटिंगची क्षमता बघता चौथ्या क्रमांकासाठी तो आदर्श उमेदवार आहे. पण त्याची फिल्डिंग थोडी कमजोर आहे,' असं गांगुली म्हणाला होता.