मुंबई : ३० मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये अनेक टीम या तगड्या आहेत. न्यूझीलंडच्या संघाला या वर्ल्ड कपमध्ये डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जात आहे. या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही. मात्र या संघानं नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळीही या संघाकडे डार्क हॉर्स म्हणूनच पाहिलं जातं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किवी आणि ब्लॅक कॅप्स म्हणून ओळखला जाणारा हा एक गुणी आणि शिस्तप्रिय संघ आहे. खेळण्यात उगाचच आगाऊ आवेश नाही आणि वागण्यातही कोणता बडेजाव नाही. मात्र शांतपणे पण तेवढात आक्रमक खेळ खेळण्यात हा संघ तरबेज आहे. या संघाची कामगिरी एकप्रकारे सायलंट किलरसारखी असते. विश्वचषकात हा संघ तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी असतो. सहावेळा या संघानं उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली.


मात्र गेल्या विश्वचषकात या संघानं अंतिम फेरीत धडक मारली होती. २०१५ विश्वचषकामध्ये न्यूझीलंड संघ उपविजेता ठरला होता. गेल्या विश्वचषकापासून किवींनी ४० एकदिवसीय सामने खेळले असून त्यातील २५ सामने त्यांनी गमावलेत. मात्र विश्वचषकातील पाच संघांविरुद्ध खेळलेल्या २८ सामन्यांतील केवळ ४ सामने त्यांनी गमावले आहेत. न्यूझीलंडचा संघावर नजर टाकल्यास जगातील सर्वाधिक स्थिर लाईन अप असलेला असा हा संघ आहे.


कॉलिन मुनरो, रॉस टेलर, हेन्री निकोलस आणि केन विलियिमसन अशी फलंदाजींची फळी त्यांच्याकडे आहे. तर टीम साऊदी, ट्रेंट बाऊल्ट यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असून मिचेल सँटनर, कॉलिन डी ग्रंडहोम आणि जेम्स निशामवर अष्टपैलू म्हणून जबाबदारी असेल.


या संघात सुपरस्टार असा खेळाडू नाही. मात्र तरीही या संघाला प्रतिस्पर्धी संघ गांभीर्यानं घेतात. कारण या संघात कोणत्याही मोठ्या संघाला पराभूत करण्याची कुवत आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांना साजेशी वेगवान गोलंदाजांची फळी आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा न्यूझीलंड संघात असल्याने हा संघ मातब्बर संघांना धूळ चारू शकतो.


भले या संघानं एकही विश्वचषक जिंकला नसेल. तरीही भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघांना नामोहरम करण्याची क्षमता या संघात आहे. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघ कधीच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात नाही. मात्र हा संघ प्रत्येक विश्वचषकात आपल्या कामगिरीची छाप सोडतो. त्यामुळे सहा वेळा उपांत्य फेरी आणि गेल्या विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारा न्यूझीलंड संघ यंदा क्रिकेटचा विश्वविजेता बनल्यास आश्चर्य वाटायला नको.