लंडन : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वेगवेगळी रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने वनडे क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मॉर्गनने १७ सिक्स मारल्या. तर याच मॅचमध्ये राशिद खान वर्ल्ड कप इतिहासातला सगळ्यात महागडा बॉलर ठरला. राशिद खानने ९ ओव्हरमध्ये ११० रनची खैरात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या मॅचनंतर दोनच दिवसात वर्ल्ड कपमधलं आणखी एक रेकॉर्ड झालं. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातल्या मॅचदरम्यान वर्ल्ड कपमध्ये दोन्ही इनिंग मिळून सर्वाधिक रनचा विक्रम झाला. या मॅचमध्ये एकूण ७१४ रन झाले. यातले ३८१ रन ऑस्ट्रेलियाने आणि ३३३ रन बांगलादेशने केले.


आता या वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रमही धोक्यात आला आहे. २००३ वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरने ६७३ रन केल्या होत्या. सचिन तेंडुलकरचा एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा हा विक्रम अजूनही कायम आहे. पण ऑस्ट्रेलियाचे ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच या दोघांकडून सचिनच्या या विक्रमाला धोका आहे.


डेव्हिड वॉर्नरने या वर्ल्ड कपच्या ७ मॅचच्या ७ इनिंगमध्ये ५०० रन केले आहेत. तर एरॉन फिंचने ७ मॅचच्या ७ इनिंगमध्ये ४९६ रन केले आहेत. सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडायला वॉर्नरला आणखी १७४ रनची तर फिंचला १७८ रनची गरज आहे.


ऑस्ट्रेलियाची सध्याची कामगिरी बघता त्यांचा सेमी फायनलमधला प्रवेश निश्चित आहे. त्यामुळे हे दोघं या फेरीतल्या उरलेल्या २ मॅच आणि सेमी फायनल अशा कमीत कमी ३ मॅच खेळतील. ऑस्ट्रेलियाची टीम फायनलमध्ये पोहोचली तर या दोघांना आणखी ४ मॅच खेळण्याची संधी मिळेल. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांचा सध्याचा फॉर्म बघता या दोघांना सचिनचं रेकॉर्ड मोडणं फारसं अवघड जाणार नाही.