World Cup 2019 : बलाढ्य इंग्लंड - ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चुरशीची लढत
लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांना आज भिडणार.
लंडन : येथील लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही तगडे संघ एकमेकांना भिडणार आहेत. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा असेल. दोन्ही संघ आपल्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करतील. त्यामुळे क्रिकेटरसिकांसाठी हा सामना खास असणार आहे. भारताबरोबरच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दोन्ही टीमध्ये तगडे खेळाडू आहेत. तसेच मोठी खेळी करणारे फलंदाज आहेत. आता हेच दोन संघ स्पर्धेत एकमेकांविरोधात खेळतील तेव्हा सामना नक्कीच रोमहर्षक होणार यात शंका नाही. इंग्लंडच्या सर्वच प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.
इंग्लंडचा जो रूट, कर्णधार ईयॉन मॉर्गन जोरादर फॉर्मात आहेत. या दोघांच्या जोडीला जोस बटलर, बेन स्टोक्सही तडाखेबंद खेळी करत आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजांनाही स्पर्धेत आतापर्यंत चांगले यश मिळाले आहे. गोलंदाज जोफ्रा आर्चरवर वेगवान तर अदिल रशिदवर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजीची मदार असेल.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघावर नजर टाकली तर त्यांच्या ताफ्यातही मोठी खेळी करणारे फलंदाज आहेत. अॅरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथसारख्या अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नरला झटपट बाद करण्यासाठी इंग्लंड संघाला विशेष रणनीती आखावी लागेल. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या खांद्यावर कांगारुंच्या गोलंदाजीची मुख्य धुरा असणार आहे. अपयशी ठरत असलेला फिरकीपटू अॅडम झम्पाच्या स्थानी संघ व्यवस्थापन नॅथन लॉयनचा विचार होऊ शकतो. त्यामुळे कोणाची निवड होते, याकडेही लक्ष आहे.
विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ७ वेळा हे दोन एकमेकांशी भिडलेत. त्यापैकी ५ सामन्यात ऑस्ट्रेलिया तर २ सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आतापर्यंत १४७ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ८१ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकलेत. तर ६१ सामन्यात त्यांना पराभवाची चव चाखायला लागली आहे. २ सामने अनिर्णित तर ३ सामने रद्द झालेत.
आजच्या सामन्यावर नजर टाकली तर ऑस्ट्रेलियन टीम तगडी वाटत आहे. मात्र, कांगारूंचा कर्णधार अॅरॉन फिंच इंग्लंड संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कारण यजमान इंग्लंड संघाला त्यांच्या चाहत्यांचा भक्कम पाठिंबा मिळेल यात शंका नाही. त्यामुळे या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन मातब्बर संघ एकमेकांचे आव्हान कसं मोडीत काढतात याकडे क्रिकेट क्रिकेटप्रेमीचे लक्ष आहे.