बर्मिंघम : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत इंग्लंडने २०१९ वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. कांगारुंनी ठेवलेल्या २२४ रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने अगदी सहज केला. ऑस्ट्रेलियाचं हे आव्हान इंग्लंडने ८ विकेट राखून ३२.१ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. त्याआधी भारताविरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा १८ रननी विजय झाला होता. त्यामुळे आता १४ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही टीम फायनलमध्ये पोहोचल्यामुळे आता क्रिकेटला नवीन विश्वविजेता मिळणार आहे. कारण न्यूझीलंड आणि इंग्लंड या टीमना एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. १९९६ नंतर पहिल्यांदाच क्रिकेटला नवीन विश्वविजेता मिळेल. १९९६मध्ये श्रीलंकेने पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं.


इंग्लंडची वर्ल्ड कपमधील कामगिरी


वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचायची इंग्लंडची ही तिसरी वेळ आहे. याआधी १९७९, १९८७ आणि १९९२ साली इंग्लंड फायनलमध्ये खेळली होती, पण या तिन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २७ वर्षानंतर आता पुन्हा एकदा इंग्लंड वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.


१९९९, २००३ आणि २०१५ वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडली होती. तर १९७५ आणि १९८३ साली इंग्लंड सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती, पण त्यांचा पराभव झाला. १९९६ आणि २०११ साली इंग्लंडला क्वार्टर फायनल गाठता आली. २००७ वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचं आव्हान सुपर-८ स्टेजला संपुष्टात आलं.


न्यूझीलंडची वर्ल्ड कपमधली कामगिरी


न्यूझीलंडने १९७५, १९७९, १९९२, १९९९, २००७, २०११ या ६ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलपर्यंत मजल मारली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. तर २०१५ आणि आता २०१९ वर्ल्ड कप अशा २ फायनलमध्ये न्यूझीलंडने प्रवेश केला आहे. १९८३ आणि १९८७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड पहिल्याच फेरीत बाद झाली होती. २००३ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचं आव्हान सुपर सिक्समध्येच संपुष्टात आलं होतं.